Headlines

करुळ येथील हुतात्मा भास्कर पांडुरंग कर्णिक स्मारकामध्ये क्रांती दिन साजरा

⚡कणकवली ता.०९-: स्वातंत्र्य लढ्यामध्ये प्राणांची आहुती देणाऱ्या क्रांतिकारक व हुतात्म्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी 9 ऑगस्ट हा दिवस क्रांती दिन म्हणून साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून 9 ऑगस्ट रोजी करुळ येथील हुतात्मा भास्कर पांडुरंग कर्णिक यांच्या स्मारकामध्ये क्रांती दिन साजरा केला गेला.

हुतात्म्यांच्या बलिदानाच्या स्मृतींना उजाळा देण्याच्या हेतूने हा कार्यक्रम तहसीलदार कणकवली,करूळ ग्रामपंचायत व नाथ पै ज्ञान प्रबोधिनी, करूळ संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात वेशभूषा स्पर्धेने झाली. या स्पर्धेमध्ये प्राथमिक विभागातील बहुतांशी विद्यार्थी विविध क्रांतिकारक व स्वातंत्र्यलढ्यातील नेते यांच्या वेशभूषा करून सहभागी झाले होते. करूळ हायस्कूल व प्राथमिक शाळेच्या विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी यावेळी सुमधूर देशभक्तीपर समूहगीते व स्फूर्तिगीते सादर करून उपस्थित मान्यवरांची मने जिंकली. त्याचबरोबर करूळ हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्यातून स्वच्छते विषयक जनजागृती केली. विविध सांस्कृतिक कार्यक्रमानंतर विविध स्पर्धांमधील विजेत्या स्पर्धकांना माननीय तहसीलदार यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. 
               सर्वप्रथम हुतात्मा भास्कर पांडुरंग कर्णिक स्मृती स्तंभास पुष्पचक्र अर्पण करण्यात आले हुतात्मास परिसरात वृक्षारोपण करण्यात आले
 भारत मातेच्या स्वातंत्र्यासाठी ज्या तरुणांनी हौतात्म्य पत्करले आहे अशा हुतात्म्यांना विसरून चालणार नाही त्यांच्या स्मृती सतत जतन करून ठेवणे गरजेचे आहे. असे उद्गार तहसीलदार आर. जे.पवार यांनी आपल्या भाषणांमधून काढले. सरपंच बबन कर्णिक तसेच करूळ हायस्कूलचे मुख्याध्यापक नारकर व मंडल अधिकारी दिलीप पाटील यांनी आपल्या भाषणातून स्वातंत्र्यासाठी प्राणांचे बलिदान दिलेल्या हुतात्म्यांच्या आठवणी जाग्या केल्या.
                  कार्यक्रमात प्रांताधिकारी वैशाली राजमाने, तहसीलदार आर जे पवार ,करूळ गावचे सरपंच वासुदेव उर्फ बबन कर्णिक,उपसरपंच श्री गोमणे,पोलीस पाटील जाधव,हुतात्मा कर्णिक यांचे वंशज चंदन कर्णिक,पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते गणेश जेठे, करूळ हायस्कुलचे मुख्याध्यापक श्री.नारकर,मंडळ निरीक्षक दिलीप पाटील, मंडळ अधिकारी नीलिमा प्रभुदेसाई, केंद्रप्रमुख सौ.जुईली सावंत,तिवरे प्राथमिक शाळा शिक्षक श्री कदम, रोटरी क्लबचे डॉ.विद्याधर तायशेटे,डॉ.सुहास पावसकर, अशोक करंबेळकर, राजा राजाध्यक्ष,करूळ हायस्कुल,व परिसरातील प्राथमिक शाळांचे शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर. जी. सावंत यांनी केले तर आभार एस. एल. खटावकर यांनी मानले.

You cannot copy content of this page