भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांचा टोला
⚡कणकवली ता.०६-: राज्यात शिंदे -फडणवीस सरकार आल्यानंतर हजारो कोटींची कामे शिंदे गटाच्या अनेक आमदारांनी आपल्या मतदार संघात नेली. केसरकर यांना त्यापैकी एकही रुपयाचा निधी जिल्ह्यात किंवा मतदार संघात आणता आला नाही. त्यामुळे आपले अपयश लपवण्यासाठी दीपक केसरकर यांनी आमचे नेते राणेंवर आरोप करु नये असा टोला भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी लगावला.
कणकवली येथील भाजपा जिल्हा कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजन तेली बोलत होते. आमच्या नेत्याने काय बोलावे काय करावे याचे अधिकार त्यांना आहेत.त्यांच्यावर बोलणारे तुम्ही कोण ? केसरकर यांनी स्वतःच्या मतदारसंघात जनतेने साधे स्वागत सुद्धा केले नाही याचे आत्मपरीक्षण करावे. शिंदे गटातील ४० आमदारांचे भव्य स्वागत आणि जाहीर मेळावे त्याच्या जिल्हयात झालेत.केसरकर हे एकमेव व्यक्ती आहेत की त्यांचे मतदारसंघात स्वागतही झाले नाही,याबद्दल केसरकरांनी आत्मपरिक्षण करावे,असा सल्ला तेली यांनी दिला. तेली म्हणाले केसरकर प्रवक्ते असतील मात्र ते त्यांच्या गटाचे आहेत, ते भाजपचे नाही. ज्या पद्धतीने काही विषयांवर गरज नसताना ते बोलत आहेत. केसरकर यांना आता स्वतःवर आवर घातला पाहिजे म्हणून मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांना सिंधुदुर्ग जिल्हा भाजपच्या वतीने निवेदन दिले जाणार आहे. राज्यात सत्ता बदल व्हावा अशी जनतेची अपेक्षा होती. तो झाला आणि शिंदे – फडणवीस सरकारने पेट्रोल वरील कर कमी केला, शेतकऱ्यांना प्रोत्साहन पर अनुदान दिले,नवनवीन योजना सुरू केल्या. त्यामुळे राज्यात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण असताना, जनता आणि सामान्य माणूस सुखी असताना.आमदार केसरकर हे नको त्या विषयाला हात घालून चांगले विषय जनतेपासून दूर नेण्याचा प्रयत्न करत आहे. केसरकर यांना भाजपच्या कोणत्याही नेत्यांवर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. आमदार आदित्य ठाकरे यांनी सुद्धा केसरकर यांना सुनावलेले आहे. त्यामुळे वेगळे स्टेटमेंट करण्यापेक्षा दुरावलेल्या लोकांना जवळ करण्याचा प्रयत्न त्यांनी करावा. आमदार केसरकर यांना शिवसेनेचा इतिहास माहित नाही. १९९९ मध्ये स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी सावंतवाडीतून मला उमेदवारी जाहीर केली होती. मात्र उद्धव ठाकरेंच्या आगे पिछे असणाऱ्या लोकांनी शिवराम दळवी यांना आयत्यावेळी उमेदवारी द्यायला भाग पडली. त्याला दत्ता दळवी अताचे खासदार विनायक राऊत यांनी खतपाणी घातले.हा इतिहास शिवसेनेचा आहे. तो पडताळून घ्यावा आणि मग राजकारण करत बसावे. सरकार आले त्या संधीचा फायदा मतदार संघाचा जनतेला करुन दिला पाहिजे,अशी मागणी राजन तेली यांनी केली.
