⚡कणकवली ता.०२-: महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ हे आशियातील सर्वांत मोठे परिवहन महामंडळ म्हणून गणले जाते. मात्र कोरोना महामारी आणि त्यानंतरच्या एसटी कर्मचाऱ्यांच्या शासनामध्ये विलिनीकरणाच्या मागणीसाठी पुकारलेल्या संपामुळे आणि माजी परिवहन मंत्री ॲड. अनिल परब यांच्या कारभारामुळे हे महामंडळ आर्थिक गोत्यात सापडले आहे. आता तर प्रवासी संख्येत ६० टक्क्यांपेक्षा अधिक घट झाल्याने महामंडळाचा डोलारा सांभाळणे कठीण झाले आहे. परिणामी कोकणातील गणेशोत्सवातील जादा प्रवासी वाहतुकीवरही परिणाम होण्याची शक्यता आहे. विद्यमान सरकारसह कोकणातील सर्वंपक्षिय आमदारांनी महामार्ग पुर्ततेसाठी तातडीने लक्ष देणे आवश्यक आहे, अशी भूमिका कोकण विकास आघाडीचे संस्थापक अध्यक्ष मोहन केळुसकर यांनी व्यक्त केली आहे.
गणेशोत्सवातील भाविक प्रवासी वर्गाच्या समस्यांबाबत कोविआची बैठक मुंबई – दादर येथील मुख्य कार्यालयात झाली. त्यावेळी केळुसकर बोलत होते. यावेळी सरचिटणीस सूर्यकांत पावसकर, उपाध्यक्ष बळीराम परब, रमाकांत जाधव, प्रकाश तावडे, मनोहर डोंगरे, नरेंद्र म्हात्रे, चंद्रकांत आंब्रे आदी पदाधिकार्यांसह ग्रामस्थ मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते.
रा. प. महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी प्रवासी सेवेतील त्रूटी जाणून उपाययोजना करण्यासाठी प्रदेशनिहाय बैठका घेतल्या. त्यात त्यांनी कोरोना पुर्व काळात पावसाळी हंगामात दररोज ६६ लाख प्रवाशांची संख्या आता २७ लाखांपर्यंत खाली आली असल्याचे स्पष्ट केले आहे, अशी माहिती देऊन केळुसकर म्हणाले, परिवहन खात्याच्या बाबतीत अपरिचित असलेल्या माजी परिवहन मंत्र्यांना एसटीच्या कारभाराची नस पायउतार होईपर्यंत समजली नाही. एसटी कर्मचाऱ्यांच्या संप व्यवस्थित हाताळता आला नाही. मविआच्या घटक पक्षांनी जाणिवपूर्वक या संपाकडे दुर्लक्ष केले. परिणामी ६ महिने लांबलेल्या या संपामुळे एसटी चा डोलारा कोसळला आहे. कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले आहे.
एसटीला सद्या गाड्याच्या सुट्या भागाची कमतरता जाणवत आहे. टायर उपलब्ध नसल्याने गाड्या आगारात उभ्या रहात आहेत. रस्त्यावर गाड्या नादुरूस्त होत असल्याने प्रवासी आणि विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तर जीवघेण्या अपघाताचे प्रमाणही वाढले आहे, असे सांगून ते म्हणाले,
एस.टी.चा संप लांबल्याने नियमित प्रवाशांनी पर्यायी व्यवस्था शोधली आहे. दुचाकी आणि चार चाकी गाड्या खरेदी केल्यात. सहा आसनी रिक्षा दुप्पट क्षमतेने प्रवासी वाहतूक करीत आहेत. परिणामी एसटी च्या प्रवासी संख्येत निम्म्यापेक्षा अधिक घट झाली आहे.
यंदाच्या गणेशोत्सवात भारतीय आणि कोकण रेल्वेने मुबलक प्रमाणात विशेष जादा गाड्यांचे नियोजन केले आहे. एसटीनेही जादा गाड्या सोडण्याचे नियोजन केले आहे. मात्र एसटीची विद्यमान परिस्थिती पहाता या गाड्यांचे योग्य नियोजन होण्याची शक्यता धूसर झाली आहे, असे स्पष्ट करून ते म्हणाले, आता नव्याने सत्तेवर आलेल्या सरकारने परिवहन मंत्री म्हणून योग्य ज्ञान असलेल्या आमदाराची नियुक्ती करणे गरजेचे आहे.
यंदाच्या गणेशोत्सवात मुंबईकर चाकरमानी मोठ्या संख्येने स्वत:च्या अथवा खासगी गाड्यांनी गावी जाण्याचे नियोजन करीत आहे. मुंबई गोवा कोकण महामार्गाची अनेक ठिकाणी दुरावस्था झाली आहे. परशुराम घाट धोक्याचा झाला आहे. या परिस्थितीत चाकरमानी पुणे, कोल्हापूर मार्गे कोकणात जाईल, अशी माहिती देऊन केळुसकर म्हणाले, गणेशोत्सवाला महिना उरला आहे. आता किमानपक्षी कोकणातील सर्वपक्षिय लोकप्रतिनिधींनी संघटित होऊन या रखडलेल्या महामार्गाच्या कामाच्या पुर्ततेसाठी प्रयत्न करायला हवेत. अन्यथा या चाकरमान्यांच्या रोषाला बळी पडावे लागेल.
