घराच्या छप्पराचे माकडांकडून नुकसान तर माकडांच्या रोजच्या उपद्रवाने नागरिक हैराण
⚡सावंतवाडी ता.०१सहदेव राऊळ-: मळगाव रस्तावाडी बाजारपेठ परिसरात गेल्या तीन चार महिन्यांपासून रानटी माकडांनी थैमान घातले असून माकडांच्या या रोजच्या उपद्रवाने येथील नागरिक खूपच हैराण झाले आहेत. येथील लोकांच्या घराच्या, ग्रामपंचायतीच्या व शाळेच्या छप्पराचे या माकडांकडून मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.
मळगाव रस्तावाडी व बाजरपेठेत माकडानी धुमाकूळ घातला आहे. एक किंवा दोन माकडे नसून टोळीच्या टोळीने माकडे येत असून रोजच या माकडांचा धुमाकूळ असतो. ही माकडे येथील लोकांच्या घराच्या छप्परावर तसेच पत्र्यावर उड्या मारत आहेत. तसेच घराबाहेर ठेवलेल्या वस्तूही या माकडांकडून पळविल्या जात आहेत. आता पावसाळा सुरु असल्यामुळे झाडावर कोणतीही फळे किंवा इतर काही या माकडांना खायला मिळत नसल्याने घराच्या छप्पराची कौले बाजूला करून घरात डोकावत आहेत. त्यामुळे लोक हैराण झाले आहेत. येथील नागरिकांनी वेगवेगळ्या प्रकारे उपाय करून पहिले पण त्याचा काही उपयोग झाला नाही तर माकडांची संख्या कमी न होता वाढतच आहे. तसेच येथील जिल्हा परिषद शाळेच्या छप्परावर सुद्धा ही माकडे धिंगाणा घालत असून बऱ्याच छप्पराचे नुकसान या माकडांकडून झाले आहे. मळगाव ग्रामपंचायतमधील ग्रामसेवकाच्या कार्यालयातील छप्परावरील काचेचे भिंग फोडून माकडांनी नुकसान केले आहे. त्यामुळे यावर काहींतरी ठोस उपाययोजना संबंधित विभागाने करून या माकडांचा कायमचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.
