अजय पाटणे;ओरोस येथील थलसेना कॅम्पची सांगता
मालवण (प्रतिनिधी)
देशाचे संरक्षण करण्यासाठी भूदल, वायुदल, नौदल अशा तीन सेना कार्यरत आहेत. सैन्यात जाऊ इच्छिणाऱ्या युवकांमध्ये शिस्त असणे आवश्यक असून प्रत्येकाला आयुष्य जगताना शिस्त गरजेची आहे. सैन्यात जाण्यासाठी एनसीसी ही पहिल्या पायरीसमान असून विद्यार्थ्यांनी एनसीसी मधून आपल्या अंगी शिस्त बाणवावी असे प्रतिपादन तहसीलदार अजय पाटणे यांनी ओरोस येथे बोलताना केले.
ओरोस येथे ५८ महाराष्ट्र बटालियन आणि एनसीसी यांच्यातर्फे गेले महिनाभर सुरू असलेल्या भारतीय थलसेना कॅम्प व सीएटीसी कॅम्पची सांगता शनिवारी झाली. ५८ महाराष्ट्र बटालियनचे कर्नल दीपक दयाळ (कमांडिंग ऑफिसर) सुभेदार मेजर गेडाम यांच्या सोबत ए.एन.ओ कॅप्टन आवटे,ए.एन.ओ ढेरे मॅडम, नंदकर सर, शेळके सर व इतर पी आई स्टाफ उपस्थित होता. ॲडम ऑफिसर कर्नल लेखराज, सुभेदार मेजर देवेंद्र सिंह, सुभेदार मेजर तुकाराम खैरनार, सुभेदार इंद्र केस, सुभेदार जितेंद्र तिवारी, बी एच एम सुरजीतसिंग इस्ट्रक्टर ,सुभेदार आर. एन. भांजा यांच्या मार्गदर्शनाखाली हा कॅम्प घेण्यात आला. राज्यातील १२०० मुलगे व मुली कॅडेट या कॅम्पमध्ये सहभागी झाले होते. यामध्ये एनसीसी विद्यार्थ्यांना फायरिंग ,ड्रिल, ऑप्टिकल, मॅप रीडिंग ,पॉईंट टू पॉईंट , ग्राउंड टू मॅप, मॅप टू ग्राउंड स्वयंमसरक्षण, निरोगी आरोग्य, स्वच्छता, सामाजिक भान, समाजसेवा, आपत्ती व्यवस्थापन योगा, युद्ध प्रशिक्षण, अशा अनेक बाबतीत मार्गदर्शन व प्रशिक्षण देणायत आले.
या कॅम्पच्या सांगता कार्यक्रमास व्यासपीठावर कर्नल दिपक दयाळ, सुभेदार मेजर दिनेश गेडाम, मालवणचे तहसीलदार अजय पाटणे, मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. उज्वला सामंत, उपशिक्षणाधिकारी (प्राथ) सिंधुदुर्ग रोमराज शेर्लेकर, क्रीडा अधिकारी विजय शिंदे, तलाठी दिलीप ठाकूर, तलाठी वसंत राठोड, लेफ्टनंट प्रा. एम. आर. खोत आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना कमांडींग ऑफिसर कर्नल दीपक दयाळ यांनी एनसीसी म्हणजे नक्की काय हे विद्यार्थ्यांना कळावे यासाठी हा कॅम्प आयोजित केला होता, स्वतःमधील क्षमता, नेतृत्व गुण दाखविण्यासाठी एनसीसी हे एक व्यासपीठ असून यातून मिळालेल्या शिकवणुकीतून विद्यार्थ्यांनी सैन्य दलातील करियरकडे वाटचाल करावी असे सांगितले. यावेळी बोलताना प्राचार्या डॉ. उज्वला सामंत यांनी परिस्थिती सोबत जुळवून घेण्याची कला एनसीसीच्या माध्यमातून शिकता येते. आपण कॉलेजमध्ये असताना एनसीसी मध्ये आपण स्वतः एकमेव मुली होतो, परंतु आज एनसीसी मध्ये मुलींची संख्या पाहून आनंद होत आहे असे सांगितले.
यावेळी झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात स.का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय, एस. आर. एम. कुडाळ, एस.पी. के सावंतवाडी, वेंगुर्ला कॉलेज, देवगड कॉलेजच्या एनसीसी कडेट्स सह इतर जिल्ह्यातील थलसेना एनसीसी कॅडेट्स यांनी सांस्कृतिक व लोक नृत्य, गायन तसेच देशभक्तीपर गाण्यांवर नृत्य सादर केली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भावेश नाईकधुरे व अनुष्का राणे यांनी केले.
