Headlines

पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येकाने पुढाकार घ्यावा…

डॉ. सचिन डोंगरे:कणकवली उपजिल्हा रुग्णालयात औषधी वनस्पतींची लागवड..

⚡कणकवली ता.११-: उपजिल्हा रुग्णालय कणकवली येथे पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत औषधी वनस्पती लागवड उपक्रम उत्साहात पार पडला. वैद्यकीय अधीक्षक डॉ. सचिन डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या उपक्रमात रुग्णालयातील अधिकारी, कर्मचारी, परिचारिका व इतर कर्मचाऱ्यांनी विविध औषधी वनस्पतींची लागवड करून पर्यावरण संरक्षणाचा संदेश दिला.

रुग्णालय परिसर अधिक हिरवागार, स्वच्छ आणि पर्यावरणपूरक करण्यासोबतच औषधी वनस्पतींचे महत्त्व सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावे, या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी लावलेल्या रोपांचे नियमित संगोपन करून त्यांचे संवर्धन करण्याचा निर्धार व्यक्त केला.

याप्रसंगी वैद्यकीय अधीक्षक डॉ. सचिन डोंगरे म्हणाले, पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षलागवड ही काळाची गरज आहे. औषधी वनस्पतींचे जतन व संवर्धन केल्यास त्याचा आरोग्य आणि पर्यावरण या दोन्ही क्षेत्रांना लाभ होतो. प्रत्येक नागरिकाने दरवर्षी किमान एक तरी झाड लावून त्याचे संगोपन करावे. उपजिल्हा रुग्णालयातही पर्यावरणपूरक उपक्रम सातत्याने राबवून परिसर अधिक हिरवागार करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.

या उपक्रमाला वैद्यकीय अधिकारी डॉ. पंकज पाटील, आरोग्य सहाय्यक प्रशांत बुचडे, विजय चौरे, अमोल माने, कक्षसेवक सुनील यादव, सी. आर. सावंत, मधुरा राणे, कविता राऊळ तसेच रुग्णालयातील अधिकारी, कर्मचारी व परिचारिका उपस्थित होत्या.

You cannot copy content of this page