Headlines

इतिहास जिवंत झाला विद्यार्थ्यांच्या कलाकृतींतून !

क.म.शि.प्र. मंडळाच्या इंग्रजी माध्यम माध्यमिक शाळेत ऐतिहासिक प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद

कुडाळ : इतिहास हा केवळ पाठ्यपुस्तकापुरता मर्यादित नसून तो संस्कृती, परंपरा आणि सामाजिक परिवर्तनाचा जिवंत दस्तऐवज आहे, याचा प्रत्यय क. म. शि. प्र. मंडळाच्या इंग्रजी माध्यम माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी साकारलेल्या ऐतिहासिक प्रदर्शनातून आला. विद्यार्थ्यांमध्ये इतिहास विषयाबद्दल कुतूहल, जिज्ञासा आणि अभ्यासू वृत्ती निर्माण करण्याच्या उद्देशाने चिं. त्र्यं. खानोलकर (आरती प्रभू) ललित कला केंद्र येथे या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले.
प्रदर्शनाचे उद्घाटन प्रमुख पाहुणे अॅड. अमोल सामंत यांच्या हस्ते झाले. यावेळी संस्थेचे कार्याध्यक्ष अरविंद शिरसाट, उपाध्यक्ष का. आ. सामंत, सहकार्यवाहक तथा इंग्रजी माध्यम माध्यमिक विभागाच्या शाळा समितीचे प्रमुख महेंद्र गवस, संस्थेच्या सदस्या श्रीमती पाटणकर, कुडाळ हायस्कूलचे मुख्याध्यापक विपीन वराडे, उपमुख्याध्यापक रंजन तेली, जुनिअर कॉलेजचे प्राध्यापक अजित व्हनमाने, इंग्रजी माध्यम प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका मुमताज शेख तसेच पालक प्रतिनिधी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांनी कल्पकता, कलात्मकता आणि संशोधनवृत्तीचा सुरेख मेळ साधत विविध ऐतिहासिक विषय प्रदर्शनातून सादर केले. ऐतिहासिक चित्रे, शिवकालीन गड-किल्ल्यांच्या प्रतिकृती, लेणी आणि मंदिरांच्या प्रतिकृतींनी प्रदर्शनाचे विशेष आकर्षण वाढवले. भारतीय चलनाचा ऐतिहासिक प्रवास तसेच लेखनलिपीच्या विकासाचा इतिहासही विद्यार्थ्यांनी माहितीपूर्ण पद्धतीने मांडला.
अश्मयुगीन मानवी जीवनाची प्रतिकृती, भारतीय कलांचा इतिहास, काळाच्या ओघात लोप पावत चाललेली शेतीची अवजारे आणि पारंपरिक दैनंदिन वापरातील वस्तू यांचे सादरीकरण उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होते. आधुनिक इतिहासातील महत्त्वपूर्ण आणि संवेदनशील घटना असलेल्या २६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्याची प्रतिकृती साकारत विद्यार्थ्यांनी या घटनेचे ऐतिहासिक व सामाजिक परिणाम प्रभावीपणे अधोरेखित केले.
प्रदर्शनातील प्रत्येक कलाकृतीतून विद्यार्थ्यांनी इतिहास केवळ पाठांतराचा विषय नसून तो अनुभवण्याचा आणि समजून घेण्याचा विषय असल्याचे दाखवून दिले. प्रतिकृती, चित्रे आणि विविध वस्तूंच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी इतिहासाला जिवंत स्वरूप देत आपल्या सर्जनशीलतेचे दर्शन घडवले.
या उपक्रमासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती संपदा संजय कामत यांची प्रेरणा व मार्गदर्शन लाभले. इतिहास विभागप्रमुख उत्तम विठ्ठल रासम आणि श्रीमती सान्वी सुरेश कुडाळकर यांनी प्रदर्शनाचे नियोजन व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनीही प्रदर्शनाच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता दहावीची विद्यार्थिनी ईशिका संतोष वारंग हिने केले, तर श्रीमती प्रज्ञा जोशी यांनी आभार मानले.
सकाळी ११ ते सायंकाळी ४.३० या वेळेत भरविण्यात आलेल्या या प्रदर्शनाला मान्यवर, पालक, शिक्षक, विद्यार्थी आणि इतिहासप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. इतिहासाचा अभ्यास पाहणे, अनुभवणे, प्रतिकृतींच्या माध्यमातून साकारणे आणि सर्जनशीलतेतून व्यक्त करणे या अभिनव पद्धतीमुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानासोबतच त्यांच्या कलात्मक, संशोधनात्मक आणि सादरीकरण कौशल्यांना मोठी चालना मिळाली.

लक्षवेधी रांगोळी

या प्रदर्शनाच्या निमित्ताने प्रवेशद्वारावर काढलेली रांगोळी लक्ष वेधून घेत होती. ही रांगोळी विद्यार्थिनी राशी सातोसे, लावण्या पेडणेकर, इशिका सावंत, स्वरदा कुडाळकर, ऋतुजा मेस्त्री तसेच माजी विद्यार्थिनी वैभवी कुडाळकर यांनी पाच ते सहा तासांच्या मेहनतीने साकारली. प्रदर्शनाला भेट देणाऱ्या प्रत्येकाने या रांगोळीचे कौतुक केले.

You cannot copy content of this page