बॅ. नाथ पै फिजिओथेरपी कॉलेजच्या प्राचार्य डॉ. प्रत्यूष रंजन बिस्वाल यांच्या संशोधनाला आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्धी
कुडाळ : परिचारिकांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळणाऱ्या ‘प्लांटर फॅशायटिस’ या टाचदुखीच्या विकारावर रुग्णालयात प्रत्यक्ष न जाता दूरस्थ पद्धतीने अर्थात ‘टेलिरिहॅबिलिटेशन’द्वारे केलेले उपचार प्रभावी ठरत असल्याचे संशोधनातून स्पष्ट झाले आहे. कुडाळ येथील बॅ. नाथ पै कॉलेज ऑफ फिजिओथेरपीचे प्राचार्य डॉ. प्रत्यूष रंजन बिस्वाल यांनी केलेले हे संशोधन आंतरराष्ट्रीय स्तरावरील ‘इंटरनॅशनल जर्नल ऑफ ड्रग डिलिव्हरी टेक्नॉलॉजी’ या नियतकालिकात प्रसिद्ध झाले आहे.
डॉ. प्रत्यूष रंजन बिस्वाल (पीटी) यांच्या नेतृत्वाखाली डॉ. रेवती नाईक, श्रुतिक चव्हाण आणि निकिता परब यांनी हे संशोधन केले. रुग्णालयातील कठीण फरशीवर दीर्घकाळ उभे राहून काम करावे लागत असल्याने परिचारिकांना टाचदुखीचा त्रास होण्याची शक्यता अधिक असते. कामाचे व्यस्त वेळापत्रक, उपचारासाठी लागणारा वेळ तसेच आर्थिक अडचणी यामुळे अनेकांना नियमितपणे फिजिओथेरपी उपचार घेणे शक्य होत नाही. परिणामी उपचार अपूर्ण राहण्याचे प्रमाणही वाढते. या समस्येवर पर्याय शोधण्यासाठी हे संशोधन करण्यात आले.
या अभ्यासासाठी दीर्घकाळ टाचदुखीचा त्रास असलेल्या ६० परिचारिका विद्यार्थिनींची निवड करून त्यांचे दोन गट करण्यात आले. सहा आठवडे चाललेल्या अभ्यासात एका गटातील सहभागींना फिजिओथेरपिस्टच्या मार्गदर्शनाखाली ‘झूम’ या व्हिडिओ माध्यमातून प्रत्यक्ष ऑनलाइन सत्रांद्वारे व्यायाम शिकविण्यात आले. दुसऱ्या गटातील सहभागींना चित्रांसह माहितीपत्रक देऊन त्याच व्यायामांचा घरी स्वतंत्रपणे सराव करण्यास सांगण्यात आले.
अभ्यासाच्या निष्कर्षांनुसार, दोन्ही गटांमध्ये टाचदुखीच्या त्रासात लक्षणीय सुधारणा झाली. वेदनेची तीव्रता मोजण्यासाठी वापरण्यात आलेल्या ‘न्युमरिकल पेन रेटिंग स्केल’नुसार, झूमद्वारे उपचार घेणाऱ्या गटाचा सरासरी वेदना गुणांक ५.३३ वरून १.६३ इतका कमी झाला. तर माहितीपत्रकाच्या माध्यमातून व्यायाम करणाऱ्या गटाचा वेदना गुणांक ५.७७ वरून २.५३ इतका घसरला. दोन्ही गटांतील सहभागींच्या शारीरिक कार्यक्षमतेतील अडथळेही मोठ्या प्रमाणात कमी झाल्याचे आढळले.
झूमद्वारे फिजिओथेरपिस्टचे थेट मार्गदर्शन मिळालेल्या गटाला तुलनेने अधिक फायदा झाला असला, तरी दोन्ही उपचार पद्धतींमधील फरक सांख्यिकीयदृष्ट्या नगण्य असल्याचे संशोधकांनी नमूद केले आहे. त्यामुळे प्रत्यक्ष क्लिनिकमध्ये जाणे शक्य नसलेल्या रुग्णांसाठी दूरस्थ फिजिओथेरपी उपचार हा प्रभावी आणि व्यवहार्य पर्याय ठरू शकतो.
या संशोधनामुळे कामाच्या ठिकाणी होणाऱ्या शारीरिक व्याधींवरील उपचारांच्या पद्धतीत नवे दालन खुले होण्याची शक्यता आहे. रुग्णालये आणि विविध आस्थापना डिजिटल आरोग्य सुविधांचा वापर करून कर्मचाऱ्यांना प्रवासाचा वेळ व खर्च वाचवत पुनर्वसन सेवा उपलब्ध करून देऊ शकतात. थेट ऑनलाइन मार्गदर्शन किंवा शास्त्रीय पद्धतीने तयार केलेल्या माहितीपत्रकाद्वारे व्यायामाचे मार्गदर्शन करून दीर्घकालीन वेदना कमी करणे आणि शारीरिक हालचाल पूर्ववत करण्यास मदत होऊ शकते, असा निष्कर्ष या अभ्यासातून समोर आला आहे.
दरम्यान, या उल्लेखनीय संशोधनाबद्दल संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर, सीईओ अमृता गाळवणकर तसेच सहकाऱ्यांनी डॉ. प्रत्यूष रंजन बिस्वाल यांचे अभिनंदन केले असून, त्यांच्या पुढील संशोधनात्मक वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
