Headlines

घारपी शाळेला बांदा-पानवळ ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांची भेट..

विविध उपक्रमांची माहिती घेत स्वच्छता अभियान व वृक्षारोपणातून दिला पर्यावरण संवर्धनाचा संदेश..

बांदा(दि.३/०९/२०२६) सह्याद्रीच्या दुर्गम आणि निसर्गरम्य भागात वसलेल्या घारपी शाळेला बांदा-पानवळ ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी भेट देत शाळेतील विद्यार्थी, शिक्षक आणि परिसराशी आपुलकीचा संवाद साधला. शहरापासून व शहरी सुविधांपासून काहीसे दूर असलेल्या या भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक जीवन, त्यांच्या समस्या, गरजा आणि शाळेत राबविण्यात येणारे विविध उपक्रम यांची माहिती महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी जाणून घेतली.
या भेटीचा मुख्य उद्देश ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांशी संवाद साधणे, त्यांच्या शैक्षणिक अनुभवांची देवाणघेवाण करणे तसेच विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकी, स्वच्छतेची जाणीव आणि पर्यावरण संवर्धनाची भावना निर्माण करणे हा होता.
घारपी शाळेत वर्षभर राबविण्यात येणारे विविध शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा, सामाजिक व पर्यावरणपूरक उपक्रमांची माहिती महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी घेतली. शाळेतील शिक्षक व विद्यार्थ्यांशी संवाद साधताना शाळेच्या कामकाजाची, विद्यार्थ्यांच्या सहभागाची तसेच विविध उपक्रमांच्या नियोजनाची माहिती जाणून घेण्यात आली. दुर्गम भागात प्रतिकूल परिस्थितीतही विद्यार्थी घेत असलेल्या शिक्षणाचे आणि शिक्षकांच्या प्रयत्नांचे यावेळी विशेष कौतुक करण्यात आले.
यानंतर शाळा परिसर स्वच्छता अभियान राबविण्यात आले. महाविद्यालयीन विद्यार्थी, घारपी शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत शाळेचा परिसर स्वच्छ केला.स्वच्छता ही केवळ एका दिवसापुरती मर्यादित न राहता ती प्रत्येकाच्या जीवनशैलीचा भाग बनली पाहिजे, असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
स्वच्छता अभियानानंतर शाळा परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. सह्याद्रीच्या हिरवाईने नटलेल्या या परिसरात विविध रोपांची लागवड करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. वृक्ष हे पर्यावरणाचे आधारस्तंभ असून त्यांचे संरक्षण व संवर्धन करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे, याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. लावलेल्या रोपांची नियमित काळजी घेण्याचे आवाहनही करण्यात आले.
‘एक विद्यार्थी – एक झाड’ या संकल्पनेतून विद्यार्थ्यांना वृक्षसंवर्धनाची प्रेरणा देण्यात आली. वाढते प्रदूषण, हवामानातील बदल आणि पर्यावरणाचा ढासळता समतोल लक्षात घेता भविष्यातील पिढीसाठी हिरवाई जपणे अत्यंत आवश्यक असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
या उपक्रमासाठी पानवळ-बांदा ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य मनोज देसाई व उपप्राचार्य जान्हवी देसाई यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच प्राध्यापक आर्या पवार,प्रा. अदिती पिळणकर,प्रा.दीपाली पडवळ, प्रा.शालिनी ठाकूर आणि
Reat Pune चे विज्ञान शिक्षक प्रा.शिवप्रसाद नाटेकर सहकार्य लाभले. कार्यक्रमला रिट पुणे आणि उमेद फाउंडेशन यांचे विशेष सहकार्य मिळाले.
कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी मुख्याध्यापक जे. डी. पाटील, सहकारी शिक्षक धर्मराज खंडागळे, आशिष तांदुळे तसेच अंगणवाडी सेविका संजना गावकर आणि अमृता कविटकर , संचिता सावंत यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
सह्याद्रीच्या कुशीत, दुर्गम भागात शिक्षणाची ज्योत तेवत ठेवणाऱ्या घारपी शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षकांसोबत घालवलेला हा वेळ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठीही प्रेरणादायी ठरला. अशा भेटींमुळे शहरी व ग्रामीण विद्यार्थ्यांमध्ये संवादाचे आणि अनुभवांच्या देवाणघेवाणीचे नवे पूल निर्माण होतात.

You cannot copy content of this page