एनसीएमसीच्या ५ व ३ रुपयांच्या कॉम्बिनेशन तिकिटांचा तुटवडा:आगार व्यवस्थापक रोहित नाईक यांच्या प्रयत्नांनंतर सेवा पूर्ववत..
⚡कुडाळ ता.०३-: कुडाळ बस आगारात एनसीएमसी (NCMC) पावती असलेल्या प्रवाशांसाठी आवश्यक असलेल्या महिला सन्मान योजनेतील ५ व ३ रुपयांच्या कॉम्बिनेशन तिकीटांचे ब्लॉक उपलब्ध नसल्याने गुरुवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास बसफेऱ्यांना अचानक ब्रेक लागला. त्यामुळे अनेक प्रवाशांना तब्बल तीन तास स्थानकात खोळंबून राहावे लागले.
रात्रीच्या सुमारास अचानक आदेश प्राप्त झाल्याने त्यानुसार आवश्यक रकमेचे तिकीट ब्लॉक आगारात उपलब्ध नव्हते. परिणामी तिकीट काढताना निर्माण झालेल्या तांत्रिक अडचणीमुळे बसफेऱ्या थांबविण्याची वेळ आली. याची माहिती मिळताच विविध बस संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी आगार व्यवस्थापकांची भेट घेत तातडीने तोडगा काढण्याची मागणी केली.
तिकीट ब्लॉक उपलब्ध नसल्याने सकाळी ११.३० वाजल्यापासून सुमारे तीन तास बससेवा विस्कळीत झाली. त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. काही काळ कुडाळ बसस्थानकात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
दरम्यान, आगार व्यवस्थापक रोहित नाईक यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी संवाद साधून या समस्येवर तातडीने तोडगा काढला. उपलब्ध असलेल्या अन्य तिकिटांचा पर्याय वापरून बससेवा सुरळीत करण्याचे लेखी निर्देश देण्यात आल्यानंतर दुपारी साडेदोनच्या सुमारास थांबलेल्या बसफेऱ्या पुन्हा सुरू करण्यात आल्या.
अचानक आलेल्या आदेशांमुळे तिकीट ब्लॉक उपलब्ध नसल्याने निर्माण झालेल्या या तांत्रिक अडचणीचा फटका मात्र ऐन प्रवासाच्या वेळी प्रवाशांना बसला. भविष्यात अशा प्रकारची परिस्थिती उद्भवू नये, यासाठी आवश्यक तिकीट ब्लॉकचा पुरेसा साठा उपलब्ध ठेवण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे.
