गद्दाराना त्यांची जागा शिवसैनिक दाखवून दिल्याशिवाय शांत बसणार नाही

संदेश पारकर ;युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचे शिवसेनेतर्फे जंगी स्वागत करणार

⚡कणकवली ता.३१-: शिवसंवाद व निष्ठा यात्रेच्या माध्यमातून सिंधुदुर्गात येत असलेले युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचे जिल्हा शिवसेनेकडून जंगी स्वागत करण्यात येणार आहे. पक्षांतर्गत कितीही उलथापालथी झाल्या असल्या तरी सिंधुदुर्गातील शिवसेना ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना मानणारी असून ती पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठिशी खंबीरपणे राहणार आहे. गद्दारी करणाऱ्यांना त्यांची जागा शिवसैनिक दाखवून दिल्याशिवाय शांत बसणार नाही. आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यात शिवसेनेची ताकद दाखवून देऊ, अशी माहिती शिवसेना नेते संदेश पारकर यांनी दिली आहे.

शिवसेनेतील काही आमदारांनी स्वतंत्र गट करून भाजपच्या साथीने राज्याची सत्ता मिळविली. शिवसेनेच्या इतिहासातील हे सर्वात मोठे बंड मानले जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर युवा सेनाप्रमुख व राज्याचे माजी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे हे शिवसंवाद व निष्ठा यात्रेच्या माध्यमातून राज्यभरातील शिवसैनिकांशी संवाद साधत असून ते सोमवार १ ऑगस्टला सिंधुदुर्गात येत आहेत.

याविषयी पारकर यांनी म्हटले आहे, ज्यांना शिवसेनेने मोठे केले, त्यांनीच पक्षाशी गद्दारी केली. दुर्दैवाने यात कोकणातीलही काहींचा समावेश आहे. मात्र, येथील सर्वसामान्य शिवसैनिक नेहमीच बाळासाहेबांच्या विचारांसोबत राहीला आहे. त्यामुळे कितीही आमदार, मंत्री गेले तरी त्याचा पक्षसंघटनेवर कोणताही परिणाम होणार नाही. तळागाळातील शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी खंबीर राहणार आहे. गद्दारी करणाऱ्यांना त्यांची जागा शिवसैनिक दाखवून दिल्याशिवाय शांत बसणार नाही.

उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात सिंधुदुर्गात विकासाचा झंझावात सुरु झाला होता. श्री. ठाकरे यांच्यामुळे तसेच खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांच्या पाठपुराव्यामुळे कोकणातील राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरण, चिपी विमानतळ, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व अद्यायावत रुग्णालय असे महत्वपूर्ण प्रकल्प मार्गी लागले. तौक्ते वादळात जिल्हावासीयांना तातडीने ५० कोटींची नुकसान भरपाई ठाकरे यांनी दिली होती. जिल्ह्यातील शेतकरी, मच्छिमार यांच्या हिताचे अनेक निर्णय ठाकरे सरकारने घेतले. कुणकेश्वर, आंगणेवाडी या धार्मिक स्थळांचा विकासही ठाकरे यांनी केला. त्यांच्यामुळेच जिल्हा नियोजनचे वार्षिक बजेट नेहमीच २०० कोटींच्या घरात राहीले होते. आदित्य ठाकरे यांनी पर्यटनमंत्री म्हणून कार्यरत असताना कोकणाच्या हिताचे अनेक निर्णय घेतले. अर्थात याची जाणिव कोकण व सिंधुदुर्गवासीयांना आहे.

सद्यपरिस्थिती पाहता केवळ शिवसैनिकच नव्हे तर राज्यातील प्रत्येक नागरिकाने बाळासाहेबांनी निर्माण केलेल्या शिवसेनेच्या पाठिशी राहणे आवश्यक आहे. कारण सर्वसामान्य मराठी तसेच कोकणी माणसाच्या न्याय हक्कासाठी शिवसेनेने अविरत संघर्ष केला आहे. आदित्य ठाकरे हे पक्षाचे युवा नेते आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा त्यांच्यामागे ठामपणे उभा आहे, हे आपल्याला दाखवून द्यायचे आहे. म्हणूनच आदित्य ठाकरे यांच्या स्वागतासाठी जिल्हावासीयांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन पारकर यांनी केले आहे.

You cannot copy content of this page