Headlines

कुडाळ मॉन्सून मॅरेथॉन मध्ये केनियाच्या विल्सन केपरॉप डंका…

विक्रमी ५९ मिनिटात कापले २१ किमी अंतर:कुडाळ मॉन्सून मॅरेथॉनला उदंड प्रतिसाद..

⚡कुडाळ ता.१३-: कुडाळ मध्ये आज झालेल्या कुडाळ मॉन्सून मॅरेथॉन मध्ये केनियाचा विश्वविजेता धावपटू विल्सन केपरॉप यांनी २१ किलोमीटरचे अंतर विक्रमी ५९ मिनिटात पूर्ण इतिहास घडवला. या मॅरेथॉन सोबतच त्याने क्रीडा रसिकांची मने सुद्धा जिंकली. या संपूर्ण मॅरेथॉन मार्गावर किपरॉपने परिधान केलेल्या जर्सी नंबर २२२२ वरच क्रीडा रसिकांचे लक्ष खिळून होते. जगातील वेगवेगळ्या देशातील मॅरेथॉन स्पर्धा जिंकलेला विल्सन किपरॉप कुडाळ मॉन्सून हाफ मॅरेथॉन धावल्यामुळे या स्पर्धेचा दर्जा वाढला असल्याची भावना क्रीडा रसिकांनी व्यक्त केली.
राणे हॉस्पिटल अँड मेडिकल रिसर्च सेंटर, सिंधुदुर्ग सायकलिस्ट असोसिएशन, कुडाळ सायकल क्लब, रांगणा रनर्स, रोटरी क्लब ऑफ कुडाळ आणि डॉक्टर्स फ्रॅटर्निटी क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी सकाळी आयोजित करण्यात आलेल्या ‘कुडाळ मॉन्सून रन २०२६’ या मॅरेथॉन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. स्पर्धेच्या तिसऱ्या वर्षी तब्बल दोन हजारांहून अधिक धावपटूंनी विविध गटांत सहभाग नोंदवत स्पर्धा यशस्वी केली.
या मॅरेथॉनचे ब्रँड ॲम्बेसेडर, केनिया देशातील आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन विजेते व ऑलिम्पिक चॅम्पियन विल्सन किपरॉप, सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे आणि माजी आमदार वैभव नाईक यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांनीही प्रत्यक्ष धावत सहभागी होत स्पर्धकांचा उत्साह वाढविला. स्पर्धेत ५ कि.मी. फन रन, १० कि.मी., १६ कि.मी. जे.आर. फन रन आणि २१ कि.मी. अशा विविध गटांचा समावेश होता. बॅ. नाथ पै शिक्षण संस्था, एमआयडीसी, कुडाळ येथून स्पर्धेला प्रारंभ झाला. नेरूर मार्गे वालावल येथील श्री लक्ष्मीनारायण मंदिर परिसरातील नदीकाठ गाठून पुन्हा बॅ. नाथ पै शिक्षण संस्था येथे स्पर्धेचा समारोप करण्यात आला.
दोन दिवसांपूर्वीच विल्सन किपरॉप यांनी कुडाळ मध्ये माध्यमांशी संवाद साधताना या मॅरेथॉनच्या मार्ग बद्दल आणि येथील हवामाना बद्दल भाष्य केले होते. इतर देशात होणाऱ्या मॅरेथॉन स्पर्धांचा मार्ग हा मुख्यतः सपाट रस्त्यांवरून होतो. पण कुडाळ मॅरेथॉनचा मार्ग हा चढ उताराचा आहे. त्यात येथील वातावरणामध्ये आर्द्रता जास्त आहे. त्यामुळे येथे धावण्यासाठी निश्चितच आव्हानातम्क परिस्थिती आहे. अशा प्रकारच्या वातावरणात मी कधीच धावलेलो नाही. त्यामुळे मी या स्पर्धेत नक्की धावणार असे विल्सन किपरॉप याने स्पष्ट केले होते. त्याप्रमाणे आज तो २१ किलोमीटर हाफ मॅरेथॉन धावला २२२२ जर्सी परिधान करून धावला आणि केवळ ५९ मिनिटात त्याने हि स्पर्धा पूर्ण करून इतिहास घडवला. त्याबद्दल राणे हॉस्पटिलचे ए टी राणे आणि डॉ. जी टी यांनी यांनी त्याचे विशेष अभिनंदन केले.
यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, शिवसेना (उबाठा) माजी आमदार तथा जिल्हाप्रमुख वैभव नाईक, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार)पक्षाचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत, जिल्हा पोलीस अधीक्षक मोहन दहीकर, राणे हॉस्पिटल अँड मेडिकल रिसर्च सेंटरचे डॉ. जी. टी. राणे, अजित राणे, सिंधुदुर्ग सायकलिस्ट असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष गजानन कांदळगावकर, डॉ. प्रशांत सामंत, डॉ. जयसिंग रावराणे, रूपेश तेली, शिवप्रसाद राणे, उमेश गाळवणकर, सचिन मदने, विविध अधिकारी, पदाधिकारी, सामाजिक व क्रीडा क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. तसेच टीम कुडाळ मॉन्सून रनचे सदस्य उपस्थित होते. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाबद्दल सहभागी धावपटूंनी आणि उपस्थितांनी आयोजकांचे कौतुक केले.

You cannot copy content of this page