⚡सावंतवाडी ता.३०-: मळगाव रस्तावाडी येथील शारदा विद्यालय मळगाव या जिल्हा परिषद शाळेची जनरल पालक सभा पालकांच्या उपस्थितीत खेळीमेळीत पार पडली. या सभेत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.
यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दाजी सावंत, शाळेच्या मुख्याध्यापिका अनुराधा सुर्वे, शिक्षिका सीमा सावंत, विश्वनाथ गोसावी, गोपाल नार्वेकर, सिद्धेश तेंडोलकर, कृष्णा गावडे, पालक विजय ठाकूर, सच्चीदानंद मेस्त्री, विश्वनाथ राऊळ, राजू निरवडेकर, सहदेव राऊळ, संतोष गावडे आदी उपस्थित होते
जनरल पालक सभेचे अध्यक्षस्थान विश्वनाथ राऊळ यांनी भुषविले. सभेच्या सुरुवातीला अनुराधा सुर्वे यांनी मागील सभेचे इतिवृत्त वाचन वाचन केले. त्यानंतर शाळेची पटसंख्या वाढल्याने शाळेला चौथा शिक्षक मंजूर झाला. त्यांच्या अभिनंदनाचा ठराव मंजूर करण्यात आला. नंतर सभेला सुरुवात झाली.
शाळा कमिटीमधून कमी झालेल्या सदस्यपदी इयत्ता पहिलीसाठी सुप्रिया नाईक, इयत्ता दुसरीसाठी सच्चीदानंद मेस्त्री, इयत्ता तिसरीसाठी माधवी शिरोडकर यांची निवड करण्यात आली. निवडीनंतर त्या सर्वांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. शिक्षक पालक संघांचे माजी सदस्य विश्वनाथ गोसावी व साक्षी गावकर यांनी शाळेने मारलेल्या हाकेला वेळोवेळो मदत केली, त्याबद्दल त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. त्यानंतर पालकांनी शाळेसाठी काढलेल्या देणगीतून शाळेसाठीचे पंखे बसविणे, डिश अँटीना लावणे, फोटो लावण्यासाठी लाकडी पट्टी बसाविणे तसेच इतर किरकोळ खर्चाचे व शिल्लक रक्कमचे वाचन करण्यात आले. शाळेची पटसंख्या ९० पेक्षा वाढून सुद्धा शाळेला अजूनही ग्रामपंचायती कडून रंगकाम करण्यात आले नाही, याबद्दल ग्रामसभेत जाब विचारण्याचे सर्वानुमते ठरविण्यात आले. तसेच शाळेतील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्याविषयीं चर्चा करण्यात आली. रोजच्या पोषण आहारात मुलांना देत असलेल्या जेवणाविषयीही मुख्याध्यापकांनी उपस्थित पालकांना माहिती दिली. तसेच रोजच्या पोषण आहारात लागणाऱ्या नारळासाठी पालकांनी काढण्याचे सर्वानुमते ठरविण्यात आले. आभार मुख्याध्यापिका अनुराधा सुर्वे यांनी मानले.
