वेंगुर्ले नगरपरिषदेत नियोजन बैठक संपन्न
वेंगुर्ला प्रतिनिधी- वेंगुर्ला नगरपरिषदेच्यावतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव अंतर्गत ‘हर घर तिरंगा‘ उपक्रम राबविण्याबाबत बैठक संपन्न झाली. स्वराज्य महोत्सव २०२२ अंतर्गत वेंगुर्ला नगरपरिषद हद्दीत ९ ते १७ ऑगस्टया कालावधीत सर्वांनी मिळून हा उपक्रम यशस्वी करण्याचा निर्धार वेंगुर्ला नगरपरिषद छत्रपती शिवाजी महाराज सभागृह येथे झालेल्या बैठकीत करण्यात आला. यावेळी मुख्याधिकारी डॉ.अमितकुमार सोंडगे यांनी शासनाने दिलेल्या रुपरेषेनुसार सविस्तर माहिती दिली.
९ ऑगस्ट रोजी बॅ.खर्डेकर कॉलेज-दाभोली नाका-जुना एस.टी.स्टँड-शिरोडा नाका-पॉवर हाऊस येथून स्टेडियमपर्यंत मोटरसायकल रॅली, १० ऑगस्ट रोजी सकाळी ८ वा. डच वखार येथे स्वच्छता मोहिम, १२ ऑगस्ट रोजी महिला बचत गटांसाठी कार्यक्रम, १३ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वा.बॅ.खर्डेकर कॉलेज-दाभोली नाका-जुना एस टी स्टँड -शिरोडा नाका-पावर हाऊस येथून स्टेडियम अशी सायकल रॅली, सेंद्रिय शेती मार्गदर्शन शिबिर, १४ ऑगस्टरोजी सकाळी ८ वा. वृक्षारोपण, रात्री १०.३० वा. बॅ. खर्डेकर कॉलेज ते दाभोली नाका अशी मशाल फेरी, १५ ऑगस्ट रोजी सर्व शासकीय कार्यालये, शाळा, न.प.कार्यालय व नागरिक प्रभातफेरी, १६ ऑगस्ट रोजी दुपारी ३ ते ६ या वेळेत शालेय देशभक्तीपर समूहगीत स्पर्धा व इतर सांस्कृतिक कार्यक्रम, १७ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ ते ९ या वेळेत देशभक्तीपर चित्रपट आदी उपक्रम सर्वांनी मिळून यशस्वी करण्याचे नियोजन करण्यात आले.
यावेळी माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप, प्रशासकीय अधिकारी संगिता कुबल, भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई, माजी उपनगराध्यक्ष शितल आंगचेकर, व्यापारी संघाचे सौदागर, भाजपा तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, प्रशांत आपटे, माजी उपसभापती स्मिता दामले, ज्योती देसाई, माझा वेंगुर्लाचे निलेश चेंदवणकर, राजन गावडे, वृंदा गवंडळकर, गणेश अंधारी, राजू पांगम, बॅ.खर्डेकर कॉलेजचे प्रा.गायकवाड, वैभव म्हाकवेकर आदी उपस्थित होते.
