नियम मोडून वाहन चालविणाऱ्या वाहन चालकांना आता मोठा दंड

वाहन परवाना निलंबित;वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन

⚡कणकवली ता.२७-: सुधारित मोटार वाहन कायद्यातील दंड व नियम यांची अंमलबजावणी सिंधुदुर्गात सुरू झाली आहे.
वाहतुकीचे नियम मोडून वाहन चालविणाऱ्या वाहन चालकांना आता मोठा दंड बसणार आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांना दहा हजार रूपयापर्यंत दंड बसणार आहे. तसेच वाहतूक परवाना देखील निलंबित होणार आहे. त्‍यामुळे वाहतूक नियमांचे पालन करूनच वाहन चालवावीत असे आवाहन महामार्ग वाहतूक पोलीस मदत केंद्र ओसरगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अरूण जाधव यांनी केले आहे.


महाराष्ट्र शासनाने केंद्रीय मोटार वाहन कायद्याची अंमलबजावणी सुरू केल्‍याने सर्वप्रकारच्या दंडात मोठी वाढ झाली आहे. या प्रामुख्याने परवाना नसताना वाहन चालविल्यास पूर्वी १००० रुपये दंड होता, आता ५००० रुपये करण्यात आला आहे. वाहन चालविताना मोबाईलचा वापर केल्यास पूर्वी सरसकट पाचशे रूपये दंड आकारला जात होता. परंतु आता प्रत्येक वाहनासाठी वेगवेगळा दंड आकारला जाणार आहे.
राज्‍य शासनाने मोटार वाहन कायद्यातील दंडाच्या रक्‍कमेत वाढ करण्याचा निर्णय यापूर्वीच घेतला होता. मात्र ‘ई’ चलान प्रणाली अद्ययावत झाली नव्हती. सिंधुदुर्ग वाहतूक विभागाकडील ‘ई’ चालन प्रणाली २६ जुलैच्या मध्यरात्री पासून अद्ययावत करण्यात आली आहे. त्‍यामुळे नियम मोडणाऱ्या वाहन चालकांचा आता खऱ्या अर्थाने खिसा रिकामा होणार आहे. केंद्रीय मोटार वाहन कायद्याची अंमलबजावणी महाराष्‍ट्रात सुरू झाल्‍यानंतर वाहन चालकांतून तीव्र प्रतिक्रिया उमटल्‍या होत्या. मात्र जानेवारी २०२२ पासून ठिकठिकाणी ‘ई’ चलान प्रणाली अद्ययावत करून याची अंमलबजावणी सुरू करण्यात आली. सिंधुदुर्गात २६ जुलै पासून सुधारीत वाहतूक नियमानुसार दंडाची अंमलबजावणी सुरू झाली आहे.
पूर्वी हेल्मेट नसल्यास ५०० रुपये दंड आकारला जात होता. यामुळे अनेक वाहनधारक दंड भरून निघून जात होते. परंतु आता दंडाच्या रकमेत वाढ करण्यात आली नसली तरी तीन महिन्यासाठी वाहन परवाना निलंबित करण्याची तरतूद करण्यात आली आहे. शिवाय, पीयूसी नसल्यास तीन महिन्यासाठी परवाना निलंबित केला जाणार आहे.
मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवल्यास १० हजार रूपये किंवा त्याहून अधिक दंड किंवा ६ महिन्यांचा तुरूंगवास किंवा दोन्ही शिक्षा होतील. मात्र, हाच गुन्हा पुन्हा केल्यास १५ हजार रूपये किंवा त्याहून अधिक दंड किंवा २ वर्षांचा तुरुंगवास किंवा दोन्ही शिक्षा होतील.
दरम्‍यान अपघातांची संख्या कमी करण्याच्या उद्देशाने केंद्राने घेतलेल्या निर्णयाची राज्यात अंमलबजावणी करण्यात आली आहे. ‘ई’ चलान प्रणाली अद्ययावत झाल्‍याने सिंधुदुर्गातही वाढीव दंड आकारण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या कारवाईमुळे बेशिस्तीचे प्रमाण कमी होईल. तसेच दंडाच्या रकमेत मोठी वाढ झाली असली तरी नियम पाळणाऱ्यांना दंडाची भीती बाळगण्याची आवश्‍यकता नाही असेही महामार्ग वाहतूक पोलीस मदत केंद्राचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अरूण जाधव यांनी सांगितले. सुधारित दंडाच्या रकमेमध्ये परवाना नसताना वाहन चालविणे ५०००,फॅन्सी नंबरप्लेट, १०००, पोलिसांच्या सूचनेचे पालन न केल्यास, पळून गेल्यास ७५०, अनधिृकत व्यक्तीला वाहन चालविण्यास दिल्यास ५०००, वाहनाचे परमिट नसल्यास १०,०००, पीयुसी नसल्यास १,०००, वेगमर्यादेचे उल्लंघन केल्यास (दुचाकी व तीनचाकी १०००,वेगमर्यादेचे उल्लंघन केल्यास (कार ) २०००, वेगमर्यादेचे उल्लंघन केल्यास (जड वाहन ) ४०००, वाहन चालविताना मोबाईलचा वापर केल्यास (दुचाकी व तीनचाकी) १०००, वाहन चालविताना मोबाईलचा वापर केल्यास (कार) २०००, वाहन चालविण्यास अपात्र असताना वाहन चालविल्यास १०००, शर्यत लावणे आणि वेग अजमाविणे ५०००, वाहनात बदल केल्यास प्रथम १०००, प्रत्येक बदलासाठी २०००, नोंदणी न करता वाहन चालविल्यास १००००, वाहनाबाहेर माल आल्यास २०,०००, विमा नसताना वाहन चालविल्यास पहिल्या गुन्ह्याकरिता २०००, दुसऱ्या गुन्ह्याकरिता ४०००,सीटबेल्ट लावला नसल्यास यापूर्वी २०० रूपये दंड तर आता १००० रूपये, हेल्मेट नसल्यास आधी २०० तर आता १००० रूपये दंड आणि तीन महिन्यांपर्यंत वाहन परवाना रद्द, परवाना रद्द असूनही वाहन चालवल्यास १० हजार रूपये किंवा ३ महिन्यांचा तुरूंगवास किंवा दोन्ही शिक्षा,भरधाव गाडी चालवल्यास ५ हजार रूपये किंवा त्याहून अधिक किंवा ३ महिन्यांचा तुरूंगवास किंवा दोन्ही शिक्षा होतील. वाहन चालवताना सिग्नल तोडल्यास ५ ते १० हजार ते रूपये दंड किंवा सहा ते बारा महिने तुरुंगवास, मोठमोठ्यानं हॉर्न वाजवल्यास पहिल्यांदा एक हजार रूपयांचा दुसऱ्यांदा २ हजार, वाहनाला विमा संरक्षण नसल्यास दोन हजार रूपयांपर्यंत दंड किंवा तीन महिन्यांचा तुरुंगवास अशी सुधारित दंडाची रक्कम लागू झाली आहे त्यामुळे या नियमांचे पालन करा असे आवाहन श्री जाधव यांनी केले आहे.

You cannot copy content of this page