पर्यटकांनाही वर्षा पर्यटनाचा सुरळीतपणे लुटता आला आनंद
आंबोली । प्रतिनिधी : बेधुंद पर्यटकांमुळे वर्षा पर्यटनावेळी आंबोलीत होणारी ट्रॅफिक व घिसाडगर्दी यावर अखेर जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. राजेंद्र दाभाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी सुयोग्य नियोजन करूनआळा बसविल्याने रविवारी आंबोलीत पर्यटकांनाही वर्षा पर्यटनाचा आनंद सुरळीतपणे लुटता आला.
वर्षा पर्यटनामुळे जगप्रसिद्ध झालेल्या आंबोली पर्यटन स्थळाला बेधुंद व नशाबाज पर्यटकांमुळे गालबोट लागत होते. या बेधुंद पर्यटकांनी पार्क केलेल्या वेड्यावाकड्या गाड्यांमुळे रविवार बुधवार व सुट्ट्यांच्या दिवशी ट्राफिक जाम होत असल्याने वाहनधारकांनाही मोठा मनस्ताप सहन करावा लागत होता. त्याचा परिणाम थेट पर्यटनावर होत असल्यामुळे आंबोलीतील व्यावसायिकही त्रस्त होते.
त्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. राजेंद्र दाभाडे यांनी अशा बेधुंद पर्यटकावर आणण्यासाठी ॲक्शन प्लान तयार केला होता. ट्राफिक जाम व अपघात रोखण्यासाठी त्यांनी मोठे पाऊल उचलले होते. त्याचा रविवारी प्रत्यक्ष प्रत्यय दिसून आला. पोलीस प्रशासनाच्या नियोजनामुळे वाहने एका बाजूला व्यवस्थित पार्क केली गेली. त्यामुळे वाहनधारकांना त्याचा चांगला अनुभव आला तसेच बेधुंद पर्यटकावरही आळा बसल्यामुळे अन्य कुटुंब वत्सल पर्यटकांना वर्षा पर्यटनाचा मनसोक्त आनंद लुटता आला.
जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. राजेंद्र दाभाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सावंतवाडीच्या पोलीस उपविभागीय अधिकारी डॉ. रोहिणी सोळंके, पोलीस निरीक्षक शंकर कोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित गोते, कर्मचारी शंभा पाटील, दत्ता देसाई, पोलीस नाईक दीपक शिंदे यांसह वाहतूक पोलीस व अन्य पोलीस कर्मचाऱ्यांनी यावेळी विशेष मेहनत घेत पर्यटनाला लागत असलेले गालबोट दूर करण्यासाठी प्रयत्न केले. यामूळे वाहनधारक व पर्यटकांमधून समाधान व्यक्त होत होते.
