दांडी व तळाशील येथील मच्छीमारांचा समावेश
मालवण (प्रतिनिधी)
मासेमारी बंदी कालावधी उठण्यास काही दिवसांचा अवधी असतानाच गेला आठवडाभर मालवणच्या मच्छि बाजारात मोरी, सुरमई, बांगडा अशी किमती मासळी मोठ्या प्रमाणावर विक्रीस येऊ लागली आहे. मासेमारी बंदी कालावधी असताना ही मासळी विक्रीस आल्यानंतर सुशेगात असलेल्या मत्स्य विभागाला उशिराने का होईना जाग आली असून नौकांवर आऊट बोर्ड लावण्याच्या कारणावरून मालवण दांडी येथील सात तर तळाशील येथील एका मच्छिमाराला मत्स्यव्यवसाय विभागाकडून उद्या सोमवारी कारणे दाखवा नोटीसा बजावण्यात येणार आहेत.
मासेमारी बंदी कालावधी सुरू असतानाही यांत्रिक नौकांच्या साह्याने समुद्रात मासेमारी होत असल्याची बाब समोर आल्यानंतर मत्स्य परवाना अधिकारी मुरारी भालेकर आणि सागर सुरक्षा रक्षक दीपेश मायबा पोलीस बंदोबस्तात मालवण बंदर जेटी ते दांडी आवार अशी मोटारसायकलने गस्त घातली. मत्स्य विभागाचे अधिकारी कारवाईसाठी आल्याचे समजताच मच्छीमारांनी आपल्या नौकेला असलेले इंजिन काढून ते घरी नेले. मत्स्य अधिकारी जर आपल्या नौकेजवळ आले तर तेव्हा आमच्या नौकेला इंजिनच नव्हते आणि त्यामुळे आम्ही वल्हवून मासेमारीस गेलो होतो, असे भासविण्याचा प्रयत्न अन्य मच्छीमारांनी केला.
या गस्ती दरम्यान ज्या नौकांवर आऊटबोट इंजिन लावलेले दिसून आले त्या पाच ते सहा नौकांची छायाचित्रे घेण्यात आली आहेत. छायाचित्रे घेतलेल्या संबंधित नौका मालकांना सोमवारी नोटिसा बजावून सर्वप्रथम त्यांचे म्हणणे ऐकून घेतले जाणार आहे. त्यानंतरच पुढील कारवाई प्रस्तावित केली जाणार आहे. कारण प्रत्यक्ष समुद्रात मासेमारी करताना या नौकांना पकडले गेलेले नाही. किनाऱ्यावर नौकेला इंजिन लावलेल्या स्थितीत त्या उभ्या होत्या. त्यामुळे महाराष्ट्र सागरी मासेमारी अधिनियमानुसार त्यांच्यावर थेट कारवाई प्रस्तावित करता येत नाही.
दरम्यान, मत्स्य विभागाच्या धडक मोहिमेवर अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे जिल्हा उपाध्यक्ष भाऊ मोरजे यांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करीत मत्स्य विभाग मच्छीमारांवर थेट कारवाई करू शकत नाही, अशी भूमिका मांडली आहे. त्यामुळे मच्छीमारांवर नेमकी काय कारवाई केली जाते याकडे लक्ष लागून राहिले आहे.
