Headlines

‘हॉरिझॉन्टल ड्रिलिंग’द्वारे मालवणात टाकली जाणार भूमिगत वीजवाहिनी

कुंभारमाठ ते तारकर्ली लाईनवर होणार प्रात्यक्षिक

मालवण (प्रतिनिधी)

वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्याच्या समस्येतून मालवणवासीयांची मुक्तता करण्यासाठी संपूर्ण रस्ते न खोदता ‘हॉरिझॉन्टल ड्रिलिंग’ या आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे जमिनीच्या आतून भूगर्भीय वीजवाहिनी टाकण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक येत्या दोन दिवसांत कुंभारमाठ ते तारकर्ली लाईनवर महावितरण, मालवण नगरपालिका आणि महाराष्ट्र ग्राहक पंचायतीच्या प्रतिनिधींसमोर दाखवले जाणार आहे, असे मालवण येथील वीज वितरण कार्यालयात पार पडलेल्या ‘ऊर्जा मित्र’ समितीच्या बैठकीत सांगण्यात आले.

महाराष्ट्र ग्राहक पंचायतीच्या सततच्या पाठपुराव्याने महावितरणच्या उपविभागीय कार्यालयामध्ये दर महिन्याच्या तिसऱ्या बुधवारी ‘ऊर्जा मित्र’ बैठक घेतली जाते. आज मालवण उपकेंद्रात पार पडलेल्या या बैठकीत ग्राहकांच्या वैयक्तिक व सार्वजनिक तक्रारींवर महावितरणचे अधिकारी व ग्राहक पंचायत यांच्यात समन्वय साधून चर्चा करण्यात आली. या बैठकीस ग्राहक पंचायतीचे अध्यक्ष श्रीकांत वेंगुर्लेकर, नितीन वाळके, महिला सहसंघटक वफा खान, नीलकंठ मालणकर, शिशुपाल राणे, मिनीन फर्नांडिस आणि नशिखा खान उपस्थित होते. महावितरणच्या वतीने उप अभियंता सचिन म्हेत्रे, ग्रामीण सहायक अभियंता राहुल केकान व उच्चस्तरीय लिपिक अमोल भोगले उपस्थित होते.

मालवण शहरात पारंपरिक पद्धतीने रस्ते खोदून लाईन टाकल्यास नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. मात्र हॉरिझॉन्टल ड्रिलिंग पद्धतीमुळे रस्ते न खराब करता रस्त्याखालून भोक पाडून वीजवाहिनी टाकणे शक्य होणार आहे. दोन दिवसांतील प्रात्यक्षिक यशस्वी झाल्यास पावसाळ्यात व इतर दिवसांत वारंवार होणाऱ्या ट्रिपिंग आणि वीजखंडाच्या समस्येतून शहराला कायमचा दिलासा मिळू शकेल, असे यावेळी सांगण्यात आले.

बैठकीत शहरातील इतर काही गंभीर समस्यांवरून सदस्यांनी महावितरणच्या कारभारावर जोरदार ताशेरे ओढले. मिनीन फर्नांडिस यांच्या घरात त्यांच्या परवानगीशिवाय जबरदस्तीने दुसरा मीटर बसवण्यात आला होता. महिनाभर पाठपुरावा करून व ऑगस्टमध्ये वकिलामार्फत नोटीस पाठवूनही २१ ऑक्टोबरपर्यंत महावितरणने यावर कोणतीही कारवाई केली नव्हती. आज बैठक असल्याचे समजताच अधिकाऱ्यांनी हालचाली सुरू केल्याने सदस्यांनी महावितरणच्या निगरगट्ट कारभाराबद्दल तीव्र संताप व्यक्त केला. श्री. खान यांनी वीज जोडणीसाठी अर्ज केला असता त्यांना ८,००० रुपये कनेक्शन चार्जेस आकारण्यात आले. हे पैसे कसले आहेत? असा जाब विचारला असता अधिकाऱ्यांकडे कोणतेही स्पष्ट उत्तर नव्हते. मेढा भागातील एका ग्राहकाच्या कम्पाउंडमधून गेलेल्या वीजवाहिनीचा विषय वर्षभरापासून प्रलंबित असून, येत्या आठ दिवसांत बैठक घेऊन तो सोडवण्याचे आश्वासन महावितरणने दिले.

गणेश चतुर्थीच्या काळात दर १५ ते २० मिनिटांनी वीज खंडित होत असल्याने सणासुदीच्या दिवसांत नागरिकांचे अतोनात हाल झाले. आचरा, विरण व कुडाळ येथून वीजपुरवठा उपलब्ध असूनही महावितरणच्या नियोजनात मोठा घोळ झाला होता. याबद्दल उपस्थित सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केल्यानंतर महावितरणच्या अधिकाऱ्यांनी आपल्या चुकीची कबुली देत दिलगिरी व्यक्त केली.

You cannot copy content of this page