Headlines

मालवणच्या डम्पिंग ग्राउंडवर रेबीजग्रस्त बैलाचा मृतदेह उघड्यावर…

आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर:कचरा व्यवस्थापनातील निष्काळजीपणावर ठाकरे शिवसेनेची टीका..

⚡मालवण ता.२१-:
मालवण नगरपालिकेच्या आडारी येथील कचरा डम्पिंग ग्राउंडवर रेबीजने मृत्यू झालेल्या बैलाचा मृतदेह उघड्यावर टाकण्यात आल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. याच ठिकाणी मृत कुत्र्यांचा मृतदेहही उघड्यावर पडलेला असल्याने परिसरात दुर्गंधी आणि संभाव्य आरोग्यधोक्याबाबत चिंता व्यक्त होत आहे. या प्रकारावरून ठाकरे शिवसेनेचे नगरसेवक तपस्वी मयेकर यांनी नगरपालिका प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मालवण शहरातील सिंधुदुर्ग कॉलेज परिसरात दोन दिवसांपूर्वी रेबीजग्रस्त बैलाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर नगरपालिकेच्या स्वच्छता विभागाकडून हा मृतदेह आडारी येथील डम्पिंग ग्राउंडवर आणून कचऱ्याच्या ढिगाऱ्यात उघड्यावर टाकण्यात आल्याचे स्थानिक नागरिकांनी नगरसेवक तपस्वी मयेकर यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यानुसार मयेकर यांनी डम्पिंग ग्राउंडवर जाऊन पाहणी केली असता तेथे बैलासह मृत कुत्र्यांचे मृतदेहही उघड्यावर पडल्याचे दिसून आले.

रेबीजग्रस्त जनावराच्या मृतदेहाची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावणे आवश्यक असताना तो उघड्यावर टाकण्यात आल्याने या प्रकाराची गंभीर दखल घेण्याची मागणी मयेकर यांनी केली. मृतदेह पक्षी आणि भटकी कुत्री कुरतडत असल्याचे त्यांनी सांगितले. अशा परिस्थितीत संसर्गाचा धोका आणि परिसरातील स्वच्छतेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली. मृत कुत्र्यांच्या मृतदेहांमुळे दुर्गंधी पसरत असल्याचा आरोप करत त्यांनी आरोग्य विभागाच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित केले.
या पाहणीवेळी ठाकरे शिवसेनेचे मालवण शहरप्रमुख बाबी जोगी, नगरसेविका अनिता गिरकर, उपशहरप्रमुख किरण चव्हाण, युवासेना उपशहरप्रमुख उमेश चव्हाण, पप्या गावकर, राकेश गावकर आदी उपस्थित होते

डम्पिंग ग्राउंडवरील प्रकाराच्या पार्श्वभूमीवर मयेकर यांनी कचरा व्यवस्थापनाच्या ठेकेदाराच्या कामकाजावरही टीका केली. ठेकेदाराकडून योग्य पद्धतीने काम होत नसल्याने त्याला मुदतवाढ न देता नव्याने ठेकेदार नियुक्त करावा, अशी मागणी नगरपालिका सभेत केल्याचे त्यांनी सांगितले. याबाबत मुख्याधिकारी आणि नगराध्यक्ष यांच्याकडेही वारंवार पाठपुरावा केल्याचा दावा त्यांनी केला.
मात्र, संबंधित ठेकेदाराला मुदतवाढ देण्याच्या निर्णयावरून सत्ताधाऱ्यांच्या भूमिकेवर त्यांनी संशय व्यक्त केला. ठेकेदाराच्या कामकाजावर नियंत्रण ठेवण्यात प्रशासन अपयशी ठरत असल्याचा आरोप करत, नागरिकांच्या आरोग्यापेक्षा आर्थिक हितसंबंधांना प्राधान्य दिले जात असल्याची टीका मयेकर यांनी केली.

डम्पिंग ग्राउंडवरील मृत जनावरांच्या विल्हेवाटीचा प्रश्न तातडीने सोडवून परिसराची स्वच्छता करावी, तसेच कचरा व्यवस्थापनातील त्रुटी दूर कराव्यात, अशी मागणी या निमित्ताने पुढे आली आहे.

You cannot copy content of this page