Headlines

“महिला कक्षाचा सेंट्रल एसी पूर्ववत…

राजू मसुरकर यांच्या पाठपुराव्याला यश; पंधरा दिवसांपासून उष्म्याचा त्रास सहन करणाऱ्या महिला रुग्णांना दिलासा..

सावंतवाडी, ता. २१ : येथील उपजिल्हा रुग्णालयातील महिला अतिदक्षता कक्षाचा (सेंट्रल एसी) गेल्या पंधरा दिवसांपासून बंद असलेला एसी अखेर बुधवारी पूर्ववत सुरू करण्यात आला. त्यामुळे ऑक्टोबरच्या उष्म्यामुळे त्रस्त झालेल्या महिला रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे. महिला अतिदक्षता कक्षातील सेंट्रल एसी बंद असल्याने रुग्णांना मोठ्या उष्णतेचा सामना करावा लागत होता. ही बाब लक्षात घेऊन जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर यांनी संबंधित कंपनीच्या पुणे येथील मेंटेनन्स विभागाशी सातत्याने पाठपुरावा केला.

त्यांच्या प्रयत्नांनंतर कंपनीचे मॅनेजर सुमित काकडे यांनी एसी दुरुस्तीसाठी तंत्रज्ञ सावंतवाडी येथे पाठविले. तंत्रज्ञांनी दुरुस्ती केल्यानंतर बुधवारी सेंट्रल एसी पूर्ववत सुरू झाला. दरम्यान, उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक तथा हृदयरोगतज्ज्ञ डॉ. विशाल पाटील यांनीही सेंट्रल एसी दुरुस्तीसाठी जिल्हा रुग्णालयाचे सिव्हिल सर्जन श्रीपाद पाटील यांच्याकडे लेखी मागणी करून पाठपुरावा केला होता. तसेच जिल्हा निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. सुबोध इंगळे व संबंधित अधिकाऱ्यांकडेही याबाबत पाठपुरावा करण्यात आला. एसी बंद असल्याने रुग्णांना तात्पुरता दिलासा मिळावा यासाठी राजू मसुरकर यांच्या पुढाकारातून दहा स्टँड फॅन उपजिल्हा रुग्णालयाला उपलब्ध करून देण्यात आले होते. दानशूर व्यक्ती प्रफुल सांगोडकर, निवृत्त स्टेट बँक अधिकारी राजू भालेकर, हॉटेल व्यावसायिक उद्योजक स्वामी पोकळे व सामाजिक कार्यकर्त्यांच्या सहकार्याने हे पंखे उपलब्ध झाले. त्यामुळे महिला रुग्णांना काही प्रमाणात दिलासा मिळाला होता. दरम्यान, संबंधित पुणे येथील कंपनीचे रुग्णालयाकडे सुमारे १० लाख ५० हजार रुपये देय असल्याने एसीच्या देखभाल-दुरुस्तीच्या कामात अडथळे निर्माण होत असल्याचे सांगण्यात आले. ही थकीत रक्कम कंपनीला लवकर मिळावी यासाठीही राजू मसुरकर यांनी पाठपुरावा सुरू केला आहे. आवश्यक कागदपत्रांची पूर्तता जिल्हा वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून करण्यात आली असून, लवकरच कंपनीला थकीत रक्कम मिळण्याचे आश्वासन देण्यात आले आहे, अशी माहिती राजू मसुरकर यांनी दिली.”

You cannot copy content of this page