धुण्यासाठी समुद्रात नेलेली कार बाहेर काढताना पर्यटकाचे आले नाकेनऊ
⚡मालवण ता.२४-: मालवणच्या समुद्र किनाऱ्यावर अतिउत्साही पर्यटकांच्या गाड्या समुद्राच्या पाण्यात अडकण्याचा सिलसिला सुरूच असून दोन दिवसांपूर्वी पर्यटकांनी किनाऱ्यावर कार चालवून स्टंटबाजी केल्याची घटना ताजी असताना आज पर्यटकांनी कार धुण्यासाठी ती थेट समुद्राच्या पाण्यात नेण्याचा पराक्रम केला. कार धुताना ती पाण्यात वाळूत रुतल्याने कार बाहेर काढणे त्या पर्यटकांना मुश्किल होऊन बसले. अखेर स्थानिक नागरिकांच्या मदतीने ही कार पाण्याबाहेर काढण्यात आली.
मालवणात समुद्रकिनाऱ्यावर पर्यटनासाठी अनेक पर्यटक येत असतात. मात्र किनाऱ्यावरील वाळूत कार चालविण्याचा, कार पाण्याच्या जवळ नेण्याचा तर काहीवेळा कार धुण्यासाठी ती समुद्रात नेण्याचा प्रकार काही अतिउत्साही पर्यटक करत असतात. अशा प्रकारात कार वाळूत रुतल्याच्या तसेच पर्यटकांच्या जीवास धोका निर्माण झाल्याच्या अनेक घटना यापूर्वी मालवणच्या किनाऱ्यावर घडल्या आहेत. अलीकडे पर्यटन हंगामात अशा दोन तीन घटना घडून पर्यटकांच्या गाड्या समुद्राच्या पाण्यात अडकल्याच्या घटना घडल्या आहेत. सध्या पावसाळी कालावधीमुळे पर्यटन बंद असले तरी काही पर्यटक मालवणात येत आहेत. काही दिवसांपूर्वी मालवणच्या किनाऱ्यावर पर्यटकांची एक कार समुद्राच्या पाण्यात अडकली होती. तर दोन दिवसांपूर्वी एक मालवाहक टेम्पो देखील समुद्राच्या पाण्यात अडकला होता. तर दोन दिवसांपूर्वीच एका अतिउत्साही पर्यटकाने किनाऱ्यावर पाण्यालगत आपली कार नेऊन ती वेगाने चक्राकार पद्धतीने फिरवत स्टंटबाजी केली होती. या अलीकडच्या काही दिवसात घडलेल्या घटना असतानाच आज सकाळी मालवण बंदर जेटी नजीकच्या किनाऱ्यावर पर्यटकांनी आपली कार धुण्यासाठी थेट समुद्राच्या पाण्यात नेली. यावेळी कारची चाके हळूहळू पाणीमय वाळूत रुतली जाऊन कार अडकून पडली. समुद्राचे पाणी वाढू लागल्याने त्या पर्यटकांची एकच तारांबळ उडाली. कार पाण्याबाहेर काढण्याचे त्यांचे सर्व प्रयत्न व्यर्थ ठरले. यावेळी किनाऱ्यावर असलेल्या स्थानिक नागरिकांनी धाव घेत दे धक्का म्हणत ही कार अखेर पाण्याबाहेर काढली. यावेळी नागरिकांनी त्या पर्यटकांना योग्य ती समजही दिली.
