घराघरात हिंदू सैनिक निर्माण होणे आवश्यक

हिंदु जनजागृती सभेत डॉ. दिघे यांचे प्रतिपादन

⚡मालवण ता.२४-: अग्निपथ योजनेत समस्त हिंदू युवक सहभागी झाल्यास घराघरात हिंदुं सैनिक निर्माण होतील. देशात आज काही ठराविक शक्तिंकडून अग्निपथ सारख्या चांगल्या योजनांना विरोध दर्शविला जात आहे. हिंदु फक्त आरत्या आणि भजनातच गुंतला जावा, असे यामागचे षडयंत्र आहे. देश आणि धर्मावरील आक्रमण जर थांबवायचे असेल तर समस्त हिंदूंनी सशक्त बनणे गरजेचे बनले आहे. असे प्रतिपादन डॉ. सुभाष दिघे यांनी केले. ते मालवण येथील दत्त मंदिर येथे आयोजित हिंदू सकल समाज जागरण सभेत बोलत होते.

यावेळी भाऊ सामंत, विलास हडकर, बबन परुळेकर, अँड. समीर गवाणकर, रत्नाकर कोळंबकर, दीपक भोजने, सुदेश आचरेकर, राजेश वळंजू, आप्पा लुडबे, दीपक पाटकर, पूजा करलकर, सन्मेश परब, सदानंद धुरी, संजय गोवेकर, आबा हडकर, अन्वय प्रभू, दाजी मांजरेकर, प्रदीप वेंगुर्लेकर, भिवा शिरोडकर, अनिकेत फाटक, पवन बांदेकर, सौ. फाटक, संदीप बोडवे यांसह अन्य उपस्थित होते.

आज हिंदू धर्मावर समाज विघातक शक्तींकडून आघात केला जात आहे. हिंदु धर्मीय सहिष्णू असला तरीही आता त्याने धर्म रक्षणासाठी सशक्त बनले पाहिजे. एकजूट झाले पाहिजे. असेही डॉ. दिघे पुढे म्हणाले.

ॲड. उल्हास कुळकर्णी म्हणाले, आज राजकारणासाठी धर्माचा वापर करताना राजकारणी दिसत आहेत. परंतु पुढील काळात देशाच्या राजकारणाची सूत्रे एकहाती हिंदूंच्या हातात राहिली पाहिजेत. अशी देशात हिंदूंची ताकत उभी राहणे आवश्यक आहे. यासाठी गावा गावात हिंदू संघटक निर्माण होणे गरजेचे आहे. धार्मिक कार्यक्रमातून हिंदू जनजागृती वाढविण्याची हीच ती वेळ असल्याचेही कुलकर्णी म्हणाले.

प्रस्तावना करताना विलास हडकर यांनी देश विघातक शक्तींना वेळीच आवरण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हरेश फडते यांनी केले तर कार्यक्रमाच्या शेवटी गौरी सामंत यांनी पसायदान सादर केले.

You cannot copy content of this page