देवगड महाविद्यालयात “आपले प्रश्न, आपले विज्ञान” विषयावर चर्चासत्र संपन्न

देवगड
देवगड महाविद्यालयात उन्नत महाराष्ट्र अभियान कक्ष, आय.आय. टी., मुंबई द्वारे ‘आपले प्रश्न, आपले विज्ञान ‘ या उपक्रमावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. उन्नत महाराष्ट्र अभियान सदस्य आणि महाविद्यालयीन विद्यार्थी, शिक्षक यांमध्ये संशोधन, केस स्टडी, संशोधनसंबंधी अपेक्षा यावर चर्चात्मक संवाद साधण्यात आला.


उन्नत महाराष्ट्र अभियान (UMA) हा उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्रालयाचा एक प्रकल्प असून भारत सरकारच्या मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या उन्नत भारत अभियान (UBA) यंत्रणेशी समांतर कार्य करणारा, पूरक असा उपक्रम आहे. UMA या योजनेअंतर्गत “आपले प्रश्न आपले विज्ञान” हा उपक्रम राबविण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना स्थानिक भागातील समस्यांचा अभ्यास करण्यासाठी प्रोत्साहित करणे हा याचा हेतू आहे. या चर्चासत्रात प्रा. मिलिंद सोहनी, ( CSE & CTARA, IIT , मुंबई आणि अध्यक्ष, उन्नत महाराष्ट्र अभियान सल्लागार समिती), श्री. पार्थ बापट, व श्री. हर्षद तुळपुळे ( सदस्य, उन्नत महाराष्ट्र अभियान) यांनी विद्यार्थी आणि शिक्षकांना उन्नत महाराष्ट्र अभियान अंतर्गत प्रकल्पांसाठी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात श्री.गुरुप्रसाद घाडी, सहाय्यक प्राध्यापक, भूगोल विभाग यांनी उन्नत महाराष्ट्र अभियान आणि ‘आपले प्रश्न, आपले विज्ञान’ उपक्रम, संशोधन प्रकल्पांबद्दलच्या अपेक्षा आणि त्याचे आविष्कार स्पर्धा, संशोधन कार्य संदर्भात महत्त्व याबाबत माहिती दिली. पार्थ बापट सरांनी कोकणातील प्राकृतिक रचना आणि व्यवसाय सहसंबंध, अर्थकारण, समस्या यावर चर्चा केली. प्रा. मिलिंद सोहनी यांनी उच्च शिक्षण, नोकऱ्या आणि विकास यांची उद्दिष्ट्ये यावर सादरीकरण केले. या सादरीकरणात त्यांनी नोकऱ्यांची सद्यस्थिती, संबंधित समस्या, बेरोजगारी, शिक्षण आणि समाज यांच्यातील समन्वयाचा अभाव, अभ्यासक्रमातील रोजगाराभिमुख घटकाची गरज, उन्नत महाराष्ट्र अभियान अंतर्गत प्रकल्प आणि सामाजिक बांधिलकीची जपणूक इ. विषयांवर संवाद साधला. तर श्री.हर्षद तुळपुळे यांनी काजू प्रक्रिया युनिटवरील त्यांच्या केस स्टडीचे तपशीलवार प्रात्यक्षिक दिले. तसेच, अणसुरे गावातील जैवविविधतेच्या संपूर्ण नोंदीशी संबंधित ग्रामस्थांनी बनवलेल्या ansurebmc.in साइटचा त्यांनी थोडक्यात आढावा घेतला.
महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या डॉ. सुखदा जांबळे यांनी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये संशोधन आणि चिकित्सक वृत्तीची गरज विषद करत महाविद्यालयातील उन्नत महाराष्ट्र उपक्रमासाठी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमासाठी सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन तृतीय वर्ष विज्ञान – रसायनशास्त्र विद्यार्थिनींनी केले.
या चर्चासत्रासाठी महाविद्यालयातील प्राध्यापकांसह 89 विद्यार्थ्यांनी उपस्थित राहून मान्यवरांसोबतच्या चर्चेत सक्रिय सहभाग घेतला.

You cannot copy content of this page