संजू परब यांचा आरोप: गेल्या ५० वर्षांत अशी घटना प्रथमच; घटनास्थळी पाहणी करून अधिकाऱ्यांना दिल्या सूचना..
सावंतवाडी, ता.०२ : माठेवाडी परिसरात गटार तुंबल्यामुळे काही नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याची घटना अत्यंत गंभीर असून, गेल्या ५० वर्षांत अशी वेळ कधीच आली नव्हती. या प्रकाराला सावंतवाडी नगरपालिका प्रशासन व संबंधित ठेकेदार पूर्णपणे जबाबदार असल्याचा आरोप नगरसेवक संजू परब यांनी केला.
या घटनेनंतर संजू परब यांनी घटनास्थळी जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली.
यावेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून गटारांची तातडीने स्वच्छता करण्यासह भविष्यात अशा प्रकारची घटना पुन्हा घडणार नाही, यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या.
कामांच्या अंमलबजावणीदरम्यान नगरपालिका प्रशासनाकडून पुरेसे लक्ष दिले जात नसल्यामुळे नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत असल्याची टीका त्यांनी केली. पावसाळ्यात नागरिकांच्या घरात पाणी शिरणार नाही, यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात याव्यात तसेच लोकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, याची दक्षता प्रशासनाने घ्यावी, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.
