प्राथमिक शिक्षक समितीचा उद्या हीरक वर्धापदिन

सर्व तालुका शाखांच्यावतीने सामजिक, शैक्षणिक उपक्रमाचे आयोजन;प्रभारी जिल्हाध्यक्ष नारायण नाईक यांची माहिती

⚡ओरोस ता.२१-: २२ जुलै रोजी शिक्षक समितीच्या हिरकमहोत्सवी वर्धापन दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा सिंधुदुर्ग मधील सर्व आठ तालुका शाखांमध्ये विविध सामाजिक, शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती असल्याचे प्रभारी जिल्हाध्यक्ष नारायण नाईक यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.

२२ जुलै १९६२ रोजी पुणे येथे प्राथमिक शिक्षक समितीची स्थापना करण्यात आली त्यावेळी पहिले राज्याध्यक्ष म्हणून दत्तो वामन पोतदार( पुणे) तर पहिले राज्यसरचिटणीस वि भा येवले (सोलापूर) यांनी संघटनेचे काम सुरू केले. पण संघटना स्थापन करण्यात पुढाकार घेतला तो भानुदास शिंपी गुरूजी (जळगाव) यांनी. त्यांच्यासोबत जाॅन दियोग राॅड्रिग्ज (सिंधुदुर्ग) ,ल रा हजारे (कोल्हापूर), म द पुरी (वर्धा) ,रा वा राणे (कोल्हापूर) ,ना वा माने, अंकुश काळे (कोल्हापूर), ग गे काळंगे (सातारा) , भैय्यासाहेब शिरसागर (पुणे) आदी शिक्षकांनी सहभाग घेतला. न्यायाची चाड, त्याग आणि सेवा, अन्यायाची चीड हे ब्रीद वाक्य घेऊन शिक्षक समिती महाराष्ट्र सर्व जिल्हयात, तालुक्यामध्ये विस्तारली आणि महाराष्ट्रातील अग्रगण्य शिक्षक संघटना म्हणून नावारूपास आली.
या संघटना विस्तारात 1962 ते 1970 या काळात गो पा जाधव, सु ग आंग्रे, ज्ञा के म्हान, राजाराम माळी, केशवराव पोतदार, शंकरराव गायकवाड, कि .वा. निकम ,जिभाऊ पवार, सावळाराम अणावकर, विश्वनाथ मिरजकर, हनुमंतराव पाटील, प्रभाकर आरडे, मारोतराव सांडभोर, शंकरराव सांडभोर आदी शिक्षकांनी योगदान दिले आहे. यावर्षी संघटनेचा हिरकमहोत्सवी वर्धापन दिन संपूर्ण महाराष्ट्रात 22 जुलै रोजी विविध सामाजिक, शैक्षणिक उपक्रम आयोजित करून साजरा केला जाणारा आहे. राज्याध्यक्ष उदय शिंदे, राज्यसरचिटणीस विजय कोंबे यांनी राज्यातील सर्व जिल्हा शाखांना आवाहन केले असून सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रभारी जिल्हाध्यक्ष नारायण नाईक, जिल्हासरचिटणीस सचिन मदने यांचे नेतृत्वाखाली आठही तालुकाशाखांनी विविध सामाजिक, शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन केले आहे.
त्यानुसार कुडाळ तालुक्याच्या वतीने मातृपितृ छत्र हरपलेल्या मुलांना मदत, संघटनेच्या चडणघडणीत योगदान देणार्‍या ज्येष्ठ शिक्षकांचा सत्कार कार्यक्रम, कणकवली तालुक्याच्या वतीने शाळा जानवली येथे वृक्षारोपण, इ पाचवी शिष्यवृत्ती मार्गदर्शन आॅनलाईन उपक्रमांचे उद्घाटन, मालवण तालुक्यात वराडकर हायस्कूल कट्टा येथे रक्तदान शिबीर, आचरा येथे ज्येष्ठ समिती पदाधिकाऱ्यांचा यथोचित सन्मान, सावंतवाडीच्या वतीने अती दुर्गम भागातील चौकुळ चिखलव्हाळ बेरडकी शाळेतील मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप, विविध पुरस्कार प्राप्त सर्व शिक्षकांचा सत्कार, 60 समिती शिलेदारांचा सत्कार, चौकुळ येथील दोन केंद्रातील समिती शिलेदारांचा मेळावा, देवगडच्यावतीने निवृत्त शिक्षकांचा व नवोपक्रमशील शिक्षकांचा सन्मान ,कोळोशी येथील वृध्दाश्रीमाला जीवनावश्यक वस्तूंचे वाटप, वैभववाडीच्यावतीने ग्रामीण रुग्णालयात फळ वाटप कार्यक्रम, वेंगुर्लाच्यावतीने शालेय विद्यार्थ्यांना रक्तगट व हिमोग्लोबीन तपासणी शिबिर, तंत्रस्नेही शिक्षकांचा सत्कार, दोडामार्गच्यावतीने तालुक्यातील प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
शिक्षक समिती नेहमीच शिक्षकांच्या प्रश्नांसोबत सामाजिक बांधिलकी जोपासणारे उपक्रमही दरवर्षी राबवत असते. कोव्हीड काळात 45 लाख रूपयेचा कणकवली उपजिल्हा रुग्णालयातील आॅक्सिजन प्लांट उपक्रम संपूर्ण देशात अनोखा उपक्रम ठरला आहे. 22 जुलै रोजी साजरे होणा-या उपक्रमात जिल्हयातील शिक्षकांनी सहभागी व्हावे असे आवाहन शिक्षक समिती सिंधुदुर्ग च्यावतीने करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page