रस्ता कोसळण्याची स्थिती
तत्काळ दुरुस्ती करण्याची गरज
बांदा/प्रतिनिधी
गॅस पाईपलाईनच्या खोदाईमुळे रस्त्याच्या कडेला ठिकठिकाणी भेगा पडल्या असून काही ठिकाणी रस्ता खचल्याने अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मुंबई -गोवा महामार्गलगत वाफोली सेवा रस्त्याला २ ठिकाणी भगदाड पडल्याने येथील रस्ता केव्हाही कोसळण्याच्या स्थितीत आहे. राष्ट्रीय महामार्ग विभागाने याची तात्काळ दखल न घेतल्यास रस्ता पावसाळ्यात पूर्णपणे खचण्याची भीती व्यक्त होत आहे.
बांदा दोडामार्ग रस्त्याची साईडपट्टी ठिकठिकाणी खचली आहे. मात्र आता मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गची देखील साईडपट्टी खोदाईमुळे खचली असल्याने वाहन चालकातून संताप व्यक्त होत आहे. बांदा वाफोली रस्त्यावर वाहतुकीची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. रात्रीच्या वेळी खड्डे निदर्शनास न आल्याने अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे तात्काळ याबाबत कार्यवाही करण्याची मागणी होत आहे.
