कुडाळदेशकर ज्ञातीतील विद्यार्थ्यांनी नोकऱ्या देणारे बनावे

कुडाळदेशकर बांधवांच्या गुणगौरव सोहळ्यात दत्ता सामंत यांचे प्रतिपादन

⚡कणकवली ता.११-: प्रत्येक क्षेत्रात यशस्वी माणूस हा कष्टाशिवाय व मेहनतीशिवाय बनत नाही. प्रत्येक व्यक्तीने चांगल्या यशस्वी माणसांचे चांगले गुण घेऊन त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवला पाहिजे. पालकांनी आपल्या मुलांना निगेटिव्ह विचार न देता सकारात्मक दृष्टिकोन घेऊन चालण्याची शिकवण दिली पाहिजे. तरच विद्यार्थी भविष्यात यशस्वी होऊ शकतील असे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उद्योजक देवदत्त उर्फ दत्ता सामंत यांनी केले.

कुडाळदेशकर आद्य गौड ब्राह्मण समाजसेवा मंडळ कणकवली च्या वतीने ज्ञाती बांधवांमधील गुणवंत विद्यार्थी व समाजातील विविध क्षेत्रात नावलौकिक मिळवलेल्या व्यक्तींचा गुणगौरव सोहळा कुडाळदेशकर बांधवांच्या फोंडाघाट येथील पूर्णानंद भवन येथे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात दत्ता सामंत बोलत होते. यावेळी व्यासपीठावर म्हापसा येथील प्रा. अनिल सामंत, यशस्वी कृषी उद्योजक संजय नाईक, बेळगाव येथील प्रा. अभय सामंत, डॉ. एम. डी. देसाई, अध्यक्ष सुरेश सामंत आदी उपस्थित होते. या कार्यक्रम प्रसंगी उपस्थित असलेल्या ज्ञाती बांधवातील दोन ज्येष्ठांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी बोलताना दत्ता सामंत पुढे म्हणाले, नोकरीपेक्षा पाच पट जास्त पैसे चांगला उद्योग करून आपण मिळवू शकतो. डॉक्टर , वकील इंजिनियर बना पण त्याच सोबत उद्योजक बनण्याचे देखील ध्येय ठेवा. दुसरा काय करतोय हे पाहण्याच्या नादात आपण आपल्याला काय करायचं आहे ते विसरून जातो. व तिथेच माणूस फसतो असेही त्यांनी सांगितले.

प्रा. अनिल सामंत म्हणाले, मुले – पालक संवाद कमी होत चालला आहे., नवीन पिढी पुढारलेली आहे. त्यामुळे त्यांना त्या दृष्टीनेच मार्गदर्शन केले पाहिजे., आपले अनेक अनुभव, त्यांनी यावेळी कथन केले. तसेच वस्तुस्थितीदर्शक काही उदाहरणे देखील सांगितली. पालकांनी मुलांच्या समस्यां समजून घ्यायला हव्यात. मुलांना काय हवे काय नको त्याचा विचार केला पाहिजे. तुम्हाला काय हवे ते मुलांवर लादून उपयोग होणार नाही असेही ते म्हणाले.
प्रा. अभय सामंत म्हणाले, यशस्वी माणसाची व्याख्या काय, असा जर प्रश्न मुलांना विचारला तर मूले अनेक नावे सांगतात पण जी मोठ्या लोकांची नावे सांगितली जातात ते गुणवत्ता यादीत आले होते का? याचा विचार करा. कारण गुणवत्ता हवी मात्र ती मार्क या स्वरूपात मोजणारी असेल तर माझा त्यावर विश्वास नाही असेही त्यांनी सांगितले.
यावेळी उपस्थितांमधून मृणाल संदीप ठाकूर यांनी देखील मनोगत व्यक्त केले. कुडाळदेशकर बांधवांमार्फत आयोजित केल्या जाणाऱ्या क्रिकेट स्पर्धांमध्ये आपला कणकवलीचा संघ काही प्रमाणात कमी पडला. त्यात सुधारणा झाली पाहिजे. तरुण वर्ग एकत्र आला पाहिजे. यासाठी येत्या काळात प्रयत्न करा. तसेच आता असलेली उपस्थिती ही दुप्पट कशी होईल हे सुद्धा प्रत्येकाने पाहिले पाहिजे असे त्यांनी सांगितले. यावेळी उद्योजक दत्ता सामंत, संजय नाईक, प्रा. अनिल सामंत, प्रा. अभय सामंत, डॉ. एम. डी. देसाई, गुणवंत विद्यार्थी, विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा गुणगौरव करण्यात आला. तसेच के पी एल मध्ये सहभागी झालेल्या संघाला देखील गौरवण्यात आले. या गुणगौरव सोहळ्याचे नेटके व सुयोग्य नियोजन संचालक मंडळाच्या वतीने करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सुत्रसंचालन लक्ष्मण प्रभू यांनी केले.

You cannot copy content of this page