बांदा/प्रतिनिधी
पीएमश्री जिल्हा परिषद केंद्र शाळा बांदा नं. १ येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित तीन दिवसीय ‘स्वातंत्र्य महोत्सवा’ला अंगणवाडीतील चिमुकल्यांच्या देशभक्तीपर समूहगीत गायनाने उत्साहपूर्ण प्रारंभ झाला. १३, १४ आणि १५ ऑगस्टदरम्यान विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, पहिल्या दिवशी देशभक्तीचा उत्सव चिमुकल्यांच्या सुरेल सादरीकरणाने खुलला.
१३ ऑगस्ट रोजी प्रथम ध्वजारोहण कार्यक्रम पार पडला. त्यानंतर अंगणवाडीतील बालके, शाळेतील विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि ग्रामस्थ यांच्या सहभागाने तिरंगा रॅली काढण्यात आली. हातात तिरंगी झेंडे आणि देशभक्तीपर घोषणांनी संपूर्ण बांदा बाजारपेठ दणाणून गेली. रॅलीनंतर अंगणवाडी स्तरावरील देशभक्तीपर समूहगीत स्पर्धेला प्रारंभ झाला.
कार्यक्रमाचे उद्घाटन बांदा सरपंच प्रियांका नाईक यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. यावेळी उपसरपंच तथा शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रत्नाकर आगलावे, मराठा समाजाचे अध्यक्ष विराज परब, पत्रकार निलेश मोरजकर, माजी उपसरपंच बाळू सावंत, केंद्रप्रमुख अमोल पाटील, राकेश परब, संपदा देसाई, संतोष बांदेकर, ग्रामसंघ अध्यक्ष शिल्पा सावंत आदी उपस्थित होते.
यावेळी राज्यस्तरीय निर्भीड पत्रकारिता पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल पत्रकार निलेश मोरजकर यांचा सरपंच प्रियांका नाईक यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
सरपंच नाईक यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देताना, “अंगणवाडी सेविकांचे परिश्रम, शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षकांचे नियोजन आणि चिमुकल्यांचा आत्मविश्वास यामुळे हा कार्यक्रम अत्यंत सुंदर झाला असून, बांदा गावाच्या सरपंच म्हणून मला याचा अभिमान वाटतो.
समूहगीत स्पर्धेत बांदा पानवळ अंगणवाडीने प्रथम क्रमांक, बांदा निमजगा अंगणवाडीने द्वितीय क्रमांक, तर बांदा उभा बाजार अंगणवाडीने तृतीय क्रमांक पटकावला. विजेत्या संघांना पारितोषिके व सन्मानपत्रे प्रदान करण्यात आली, तर सहभागी सर्व संघांना उत्तेजनार्थ सन्मानपत्र देण्यात आले.
या स्पर्धेमुळे बालकांमध्ये देशप्रेम, राष्ट्रध्वजाबद्दलचा अभिमान आणि राष्ट्रीय एकात्मतेची भावना रुजण्यास मदत झाली. त्यानंतर शाळेतील इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी वर्गनिहाय देशभक्तीपर समूहगीते सादर केली. पहिल्या दिवसाचा कार्यक्रम उत्साहपूर्ण व देशभक्तीमय वातावरणात पार पडला.
१४ ऑगस्ट रोजी ध्वजारोहणासह चित्रकला स्पर्धा व ‘क्रांतिकारक’ या विषयावरील वक्तृत्व स्पर्धा संपन्न झाली. १५ ऑगस्ट रोजी मुख्य ध्वजारोहण आणि पारितोषिक वितरण समारंभाने महोत्सवाची सांगता होणार आहे.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी अंगणवाडी सेविका व मदतनिस तनुजा देसाई, रत्नप्रभा सावंतमोर्ये, देवयानी डेगवेकर, वर्षा आगलावे, किरण गावडे, मानसी बांदेकर, योगिता शिरोडकर, अक्षता सावंत यांचे मोलाचे योगदान लाभले. तसेच मुख्याध्यापक शांताराम असनकर, शिक्षक उदय सावळ, अर्चना देसाई, कृपा कांबळे, जागृती धुरी, रंगनाथ परब, कृणाली मस्के, मनीषा मोरे, फ्रान्सिस फर्नांडिस, सुप्रिया धामापूरकर आणि शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उदय सावळ यांनी केले. प्रास्ताविक मुख्याध्यापक शांताराम असनकर यांनी केले. समूहगीत स्पर्धेचे परीक्षक म्हणून रंगनाथ परब व मनीषा मोरे यांनी काम पाहिले.
फोटो:-
बांदा पीएमश्री केंद्रशाळेत आयोजित समूहगीत गायन स्पर्धेतील विजेत्यांसोबत उपस्थित असलेले मान्यवर.
बांदा केंद्रशाळेत ‘स्वातंत्र्य महोत्सवा’चा उत्साहात प्रारंभ…
