‘मी भारतीय आहे’ ही ओळख अभिमानाने सांगा:अखंड भारताचे स्वप्न पूर्ण करण्याची क्षमता पंतप्रधान नरेंद्र मोदींमध्ये – ना. नितेश राणे..
⚡कणकवली ता.१४-: तिरंगा हा प्रत्येक भारतीय नागरिकाची ओळख आहे. जगाच्या पाठीवर कुठेही गेल्यानंतर स्वतःचे नाव सांगण्याआधी ‘मी भारतीय आहे’ अशी ओळख अभिमानाने सांगितली पाहिजे. हातातील तिरंग्याचा मान आणि त्याचा अभिमान प्रत्येक भारतीयाच्या मनात असणे अत्यंत आवश्यक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली देशाच्या कानाकोपऱ्यात तिरंगा यात्रा आयोजित होत आहेत. देशभक्त नागरिक म्हणून आपणही या यात्रेत सहभागी झालो आहोत. आज अखंड भारत दिनाच्या निमित्ताने आपण एकत्र आलो असून अखंड भारताचे स्वप्न प्रत्येक भारतीयाने पाहिले आहे. हे स्वप्न पूर्ण करण्याची क्षमता आणि धमक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात आहे, असा विश्वास पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी व्यक्त केला.
कणकवली येथील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या अभियानांतर्गत आयोजित भव्य तिरंगा रॅलीच्या कार्यक्रम स्थळी ते बोलत होते. यावेळी खासदार नारायण राणे, माजी आ. अजित गोगटे, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत, माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, दिलीप तळेकर, जि. प. सदस्य मनोज रावराणे, जि. प. सदस्य सुप्रिया मेस्त्री, पंढरी वायंगणकर, विशाल कामत, संतोष गुरव, सुरेन्द्र कोदे, सर्वेश दळवी, सागर राणे, संतोष गुरव, सचिन पारधिये, दीपक मेस्त्री, प्रदीप गावडे, किशोर राणे, राकेश राणे, रविराज मोरजकर, स्वप्निल चिंदरकर, प्रकाश पारकर, महेश सावंत, संदीप साटम, नितीन गावकर, चारू साटम, बाबू गायकवाड, संजय कामतेकर, दादू राणे, संदीप सावंत, समीर सावंत, पप्पू पुजारे, समीर सावंत, शिवा राणे, प्रभाकर राणे, सुभाष मालंडकर, सावी लोके, मेघा गांगण यांच्यासह जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील देशप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या अभियानांतर्गत कणकवली विधानसभा मतदारसंघात पालकमंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. कासार्डे ब्रिज येथून सुरू झालेल्या या रॅलीची तळेरे बसस्थानक येथे सांगता झाली. हातात तिरंगा घेऊन शेकडो देशभक्त नागरिक, विद्यार्थी, माजी सैनिक तसेच विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाल्याने संपूर्ण मार्गावर राष्ट्रभक्तीचा जल्लोष पाहायला मिळाला. यावेळी तिरंगा उंच राहू दे…. भारत महान होऊ दे, राष्ट्र प्रथम, सदैव प्रथम, तिरंग्याचा मान राखूया…. भारताचा अभिमान वाढवूया अशा घोषणांनी रॅलीचा मार्ग दुमदुमून गेला. तसेच छत्रपती शिवाजी महाराज की जय, भारत माता की जय आणि हर हर महादेव च्या जय घोषणेने परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. काही शाळांमधील विद्यार्थीही हातात तिरंगा घेऊन रॅलीत सहभागी झाले होते तर काहीनी छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतिकारक, स्वातंत्र्यवीर सावरकर यांची वेशभूषा केली होती.
पुढे बोलताना ना. नितेश राणे म्हणाले, भारत माता की जय आणि वंदे मातरम् म्हणताना प्रत्येकाच्या मनात देशाबद्दलचा अभिमान जागृत झाला पाहिजे. केवळ एका दिवसापुरता देशाभिमान न ठेवता वर्षातील ३६५ दिवस देशाबद्दल अभिमान वाटला पाहिजे. आपल्या आयुष्यात पद, प्रतिष्ठा किंवा डिग्री कोणतीही असली तरी त्याआधी आपण भारतीय आहोत, ही ओळख महत्त्वाची आहे. देश सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी प्रत्येक भारतीयाची आहे, असे नितेश राणे यांनी स्पष्ट केले. राष्ट्रगीत किंवा वंदे मातरम् म्हणण्यावरून काही जण गोंधळ घालत असल्याचा उल्लेख करत त्यांनी याबाबत चिंता व्यक्त केली. प्रत्येक भारतीयाने ‘वंदे मातरम्’ म्हटले पाहिजे आणि त्याचा सन्मान राखला पाहिजे. वंदे मातरम्चा अपमान करणाऱ्यांविरोधात भारतीय म्हणून प्रत्येकाने आपली भूमिका स्पष्टपणे मांडली पाहिजे, असे आवाहन देखील ना. नितेश राणे यांनी केले.
दरम्यान ना. नितेश राणे यांनी तिरंगा रॅलीच्या माध्यमातून राष्ट्रभक्ती, राष्ट्रीय एकात्मता आणि तिरंग्याबद्दलचा अभिमान व्यक्त केला. लहान शाळकरी मुलांपासून सैनिकांपर्यंत आणि तिन्ही तालुक्यांतील भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांपर्यंत विविध स्तरातील नागरिक भारतीय म्हणून या रॅलीत सहभागी झाल्याबद्दल नितेश राणे यांनी सर्वांचे आभार मानले. भारताचे राष्ट्रगीत “वंदे मातरम’ने समारोप करण्यात आला.
