जिल्ह्यात तालुका दुसऱ्या क्रमांकावर :प.स. सभेत विद्यार्थ्यांच्या अभिनंदनाचा ठराव..
⚡कुडाळ ता.१४-: इयत्ता चौथी, पाचवी, सातवी आणि आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात कुडाळ तालुक्यातील एकूण तब्बल १५६ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक ठरले असून पाच विद्यार्थी राज्यस्तर गुणवत्ता यादीत चमकले आहेत. या यशामुळे कुडाळ तालुका जिल्ह्यात दुसऱ्या क्रमांकावर आहे. इयत्ता निहाय गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांमध्ये चौथीचे २८,पाचवीचे ३९, सातवीचे ४९, तर आठवीचे ४० अशा एकूण १५६ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली आहे.
विद्यार्थ्यांच्या या घवघवीत यशाबद्दल आज झालेल्या पंचायत समिती सभेत अभिनंदनचा ठराव घेण्यात आला आहे. कुडाळ तालुक्याच्या या चमकदार यशस्वी कामगिरीबद्दल यशस्वी विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक शिक्षक, पालक, संस्थाचालक यांचे पंचायत समितीचे सभापती मिलिंद नाईक, गटविकास अधिकारी प्रवीण हिर्लेकर, गटशिक्षणाधिकारी कैलास राऊत, तसेच सर्व पंचायत समिती सदस्य, अधिकारी आणि कर्मचारी यांनी विशेष कौतुक आणि अभिनंदन केले आहे. शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्हा परिषद शाळा शिरसोस, एमआयडीसी कुंभार चांदोसी शाळा, कुडाळ हायस्कूल आणि साळगाव हायस्कूल या शाळांच्या विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत विशेष प्राविण्य प्राप्त केले आहे. उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
