Headlines

माणगाव प्रा.आ. केंद्रात मे महिन्यापासून वीजच नाही..

प्रसूती, शस्त्रक्रिया ठप्प; पं.स. सभेत संतप्त सवाल:एसटी स्मार्ट कार्डपासून महावितरणच्या नुकसानभरपाईपर्यंत अनेक मुद्द्यांवर जोरदार चर्चा..

कुडाळ : आरोग्य व्यवस्थेला कोणतेही प्रशासन सर्वोच्च प्राधान्य देते. पण गेल्या मे महिन्यापासून माणगाव प्राथमिक केंद्रात वीजच नाही. त्यामुळे प्रसूती, लहानसहान शस्त्रक्रियाच होत नाहीयेत, या कडे आज झालेल्या पंचायत समितीच्या मासिक सभेत माणगावचे पंचायत समिती सदस्य योगेश धुरी यांनी लक्ष वेधले. त्याच बरोबर एसटीचे एनसीएमसी स्मार्ट कार्ड, वारंवार वीज जाऊनही एसओपी प्रमाणे नुकसान भरपाई मिळण्याची मागणी, रानगवे, माकडे अशा वन्य प्राण्यांमुळे होणारे नुकसान आणि उमेदच्या कर्मचाऱ्यावर सदस्यांनी घेतलेला आक्षेप या मुद्द्यांवर आज कुडाळ पंचायत समितीची सभा पार पडली.
कुडाळ पंचायत समितीच्या छत्रपती संभाजीमहाराज सभागृहात सभापती मिलिंद नाईक यांच्या अध्यक्षतेखाली आज मासिक सभा संपन्न झाली. माणगावचे पंचायत समिती सदस्य योगेश धुरी यांनी माणगाव प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये मे महिन्यापासून वीज नसल्याच्या गोष्टीकडे सभागृहाचे आणि अध्यक्षांचे लक्ष वेधले. त्यावर सध्या तात्पुरते वायर टाकून वीज जोडणी घेतली असल्याचे तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यावर देखील योगेश धुरी यांनी आक्षेप घेत जे वीज कनेक्शन घेतले आहे ते डायरेक्ट घेतले आहे. त्यामुळे रिव्हर्स करंट येऊन अपघात होण्याची शक्यता व्यक्त केली. तसेच वीज नसल्याने प्रसूती, ऑपरेशन कुठे कराव्यात हा प्रश्न असल्याचे श्री. धुरी यांनी सांगितले. तसेच आरोग्य केंद्राची सोलर व्यवस्था सुद्धा बंद आहे. आरोग्यकेंद्रात असलेली शवपेटी धूळ खात पडलेली आहे. मागणी करून सुद्धा उपलब्ध करून दिली जात नाही, असा आरोप श्री. धुरी यांनी केला. रुग्णाला जे युरीन पॉट दिले जाते ते प्रत्येक रुग्णाला स्वतंत्र देणे आवश्यक असताना एकच युरीन पॉट धुऊन त्याचा वापर अन्य रुग्णांसाठी केला जातो याकडे सुद्धा श्री. धुरी यांनी लक्ष वेधले.

कुडाळचा एसटीचा कार्ड एजंट बदलण्याच्या हालचाली

राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने एनसीएमसी स्मार्ट कार्ड वितरित करण्यात येत आहेत. पण कुडाळमध्ये ज्या एजन्सीकडे ते काम दिले आहे, ते कार्यालय बंद असते, किंवा उशिरा सुरु होते. त्यामुळे दूरवरून आलेल्या महिला, ज्येष्ठ नागरिक यांची गैरसोय होते याकडे योगेश धुरी यांनी एसटीच्या अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. त्यावर अधिकऱ्यानी सुद्धा ती बाब मान्य करून याबाबतचा अहवाल वरिष्ठांकडे पाठवण्यात आला आहे. लवकरच नवीन एजंट नियुक्ती केली जाईल आन प्रश्न सुटेल असे सांगितले.
दरम्यान एसटी बस बद्दलच्या अनेक तक्रारी सदस्य नितीन म्हाडेश्वर, संतोष कांदळकर, अमित भोगले यांनी मांडून अधिडकऱ्यांचे लक्ष वेधले. सभापती मिलिंद नाईक यांनी एसटी बस वेळेत सुटत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. उशिरा बसेस सुटत असतील तर राज्य वेळेत बसेस सुटतात ती वेळ तरी वेळापत्रकात लिहा म्हणजे प्रवासी त्या वेळेत येतील. त्यावर गुरुवार पासूनच नवीन वेळापत्रक लागू केल्याचे एसटीच्या अधिकऱ्यानी सांगितले.

….तर महावितरण नुकसान भरपाई देणार का ?

हल्ली १५ दिवसातुन शंभर वेळा महावितरणची वीज जाते. वीज वारंवार जाऊन सुद्धा बिल मात्र दुप्पट येते याकडे योगेश धुरी यांनी लक्ष वेधले. असे होत असेल तर एसओपी प्रमाणे महावितरणने ग्राहकाला नुकसान भरपाई दिली पाहिजे. पण उलटपक्षी वीजबिल वाढीव येते. त्यामुळे महावितरणने एसओपी प्रमाणे नुकसान भरपाई दिली पाहिजे अशी मागणी श्री. धुरी यांनी केली. या मागणीला बहुतेक सर्वच सदस्यांनी पाठिंबा दिला. यासंबंधीचा प्रस्ताव पाठवतो असे महावितरण कुडाळच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
दरम्यान विजेचा ट्रान्सफॉर्मर खासगी जागेत उभारले जात आहेत, याकडे सदस्य नितीन म्हाडेश्वर यांनी लक्ष वेधले. ट्रान्सफॉर्मर उभारण्यासाठी शासनाची जागा हवी याला सभापती मिलिंद नाईक यांनी देखील दुजोरा दिला. जांभवडे पंचक्रोशीसाठी कणकवलीतुन वीज पुरवठा द्यावा अशी मागणी सदस्य बाळकृष्ण मडव यांनी केली.

सा.बा. विभागाचे साईटपट्टीवर वृक्षरोपण !

सार्वजनिक बांधकाम विभाग ओरोस यांच्या वतीने रस्त्याच्या साईडपट्टीवर खड्डे मारून त्याठिकाणीवृक्षारोपण करण्यात आले असल्याची बाब बाळकृष्ण मडव यांनी जून महिन्यातील पंचायत समितीच्या मासिक सभेत मांडली होती. पण त्यावेळी लक्षवेधून सुद्धा सा. बा. विभागाने साईडपट्टीवर खडे मारून त्यात झाडे लावल्याचे श्री. मडव यांनी सांगितले. त्याकामावेळी त्याठिकाणी सक्षम कर्मचारी सुद्धा सुद्धा नसतो. असे श्री. मडव यांनी स्पष्ट करत नुसते तुमचे रिपोर्ट पाठवू नका जाऊन पाहणी करा अशा सूचना केल्या.

रानगवे, माकडे यांचा बंदोबस्त करा

रानगवे, माकडे यामुळे शेतीची नुकसानी होते. पण ती नुकसान भरपाई केवळ शेतीची दिली जाते. फळ बागायतीचे नुकसान झाले तर नुकसान भरपाई दिली जात नाही याकडे सदस्य अर्चना घावनळकर यांनी लक्ष वेधले. त्यावर आम्ही सर्व नुकसान भरपाई देतो असे वन अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच फक्त नुकसान भरपाई नको तर या वन्यप्राण्यांचा कायमचा बंदोबस्त करा अशी मागणी करण्यात आली. सदस्य संतोष कांदळकर यांनी देखील माकडांच्या उपद्रवाकडे वन अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले.
नुकसान भरपाई देताना सातबारा, आठ-अ आणि हमीपत्र दिलेले असताना वनविभाग नकाशाची मागणी करते. हे अन्यायकारक असल्याचे सदस्य योगेश धुरी यांनी सांगितले. त्यावर तो फॉर्म ऑनलाईन भरायचा असल्याने नकाशा आवश्यकच आहे असे वन अधिकारी यांनी स्पष्ट केले.त्यावर हि अट शिथिल करण्याची मागणी श्री. धुरी यांनी करून तसे पत्र वरिष्ठांना पाठ्वण्याची सूचना केली.

….तर त्या उमेदच्या अधिकाऱ्याला महिला धडा शिकवतील !

उमेदचा एक अधिकारी महिलांशी नीट वागत नाही. त्याला पाठीशी घालू नका आणि त्याला ओरोस मध्ये मुळीच पाठवू नका. जर तो ओरोस मध्ये आला तर ओरोसच्या महिलाच त्याला कायमचा धडा शिकवतील, असा इशारा सदस्य अमित भोगले यांनी दिला.

खोटे बॅनर लावू नका – सभापती

सदस्य योगेश धुरी यांनी जिल्हा परिषदेच्या विविध योजनांचा आपल्या फोटोनीशी बॅनर लावला. त्यामुळे अनेक जणांचे फोन आले. अशा योजना आपण देत नाही. त्यामुळे असे खोटे बॅनर लावू नका अशा सूचना सभापती मिलिंद नाईक यांनी सदस्य योगेश धुरी याना दिल्या. त्यावर श्री. धुरी यांनी याबाबतचे उत्तर आपण पुढच्या सभेत देऊ असे सांगितले.

अलीकडेच झालेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत कुडाळ तालुक्यातून १३६ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळून कुडाळ तालुक्याचा गुणवत्तेत जिल्ह्यात दुसरा क्रमांक आल्याचे गटशिक्षणधिकरी यांनी सांगितले. उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या अभिनंदनाचा ठराव घेण्यात आला. तसेच विशेष शैक्षणिक ग्रामसभा घेण्याच्या शासनाच्या सूचना असल्याने त्याविषयी चर्चा करण्यात आली. कृषी विभागामार्फत लवकरच रानभाजी प्रदर्शन आणि पाककला स्पर्धा घेण्यात येणार असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले.
दरम्यान या सभेत सार्वजनिक बांधकाम विभागासह अन्य काही विभागाच्या कामावर सुद्धा काही सदस्यांनी आक्षेप घेतला. त्यावर सभापती मिलिंद नाईक यांनी सदस्यांना काही गोष्टी पटवून दिल्या. सभेच्या सुरुवातीला उपसभापती सीताराम तेली यांच्या वडिलांचे निधन झाल्याबद्दल श्रद्धांजली वाहण्यात आली. सभागृहात विविध विषयांवर झालेल्या चर्चेत नितीन म्हाडेश्वर, बाळकृष्ण मडव, श्रवणी तेरसे, अमित भोगले, संतोष कांदळकर, अर्चना बंगे, मंगेश प्रभू, ममता राऊळ, अर्चना घावनळकर, दिव्यानी खरात, योगेश धुरी यांनी भाग घेतला. यावेळी गट विकास अधिकारी श्री. हिर्लेकर उपस्थित होते.

You cannot copy content of this page