बोगस सही प्रकरणातील कर्मचाऱ्यावर कारवाईची मागणी;: १७ गावांचा पाणीप्रश्न, बिलांच्या फायलींवरून सदस्य आक्रमक..
सिंधुदुर्गनगरी ता १४
बांधकाम कार्यकारी अभियंत्यांच्या खोट्या सह्या करून आर्थिक घोटाळा करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई झाली; मग याच प्रकरणाशी संबंधित कर्मचाऱ्यावर अद्याप कारवाई का नाही? असा थेट सवाल उपस्थित करत जिल्हा परिषद सदस्य संदेश उर्फ गोटया सावंत यांनी प्रशासनाला आजच्या बांधकाम समिती सभेत चांगलेच धारेवर धरले. ‘ठेकेदारांवर जशी कारवाई झाली, तशीच संबंधित कर्मचाऱ्यावरही झालीच पाहिजे,’ असा आक्रमक पवित्रा घेत त्यांनी प्रशासनाच्या कारभारावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
जिल्हा परिषद बांधकाम समितीची सभा सभापती संतोष साटविलकर यांच्या अध्यक्षतेखाली आज येथील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात झाली. समिती सचिव तथा कार्यकारी अभियंता राजेंद्र सावंत, सदस्य संदेश सावंत, रुपेश कानडे, प्रमोद रावराणे, दीपलक्ष्मी पडते, संजय बोबडी, केशव नारकर यांच्यासह अधिकारी व खातेप्रमुख उपस्थित होते.
मे महिन्यात उघडकीस आलेल्या जिल्हा परिषद बांधकाम विभागातील बोगस सही प्रकरणात संबंधित ठेकेदारांवर कारवाई करण्यात आली. मात्र, या प्रकरणात दोषी असूनही संबंधित कर्मचाऱ्यावर अद्याप कोणतीही ठोस प्रशासकीय कारवाई झालेली दिसत नसल्याचा मुद्दा संदेश सावंत यांनी पुन्हा उपस्थित केला. सभापतींकडून स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न होताच ‘तुमचे उत्तर आम्हाला मान्य नाही,’ असे स्पष्ट शब्दांत सांगत सावंत यांनी संबंधित कर्मचाऱ्यावर कारवाईची मागणी लावून धरली.
गेल्या दोन सभांपासून हा मुद्दा सातत्याने उपस्थित करूनही प्रशासनाकडून अद्याप गांभीर्याने दखल घेतली जात नसल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली. ठेकेदारांवर कारवाई आणि कर्मचाऱ्याला अभय, असा दुहेरी न्याय का? असा सवालही त्यांच्या भूमिकेतून उपस्थित झाला.
विजयदुर्ग प्रादेशिक नळपाणी योजनेतील बिघाडामुळे तब्बल १७ गावे पाण्यापासून वंचित असल्याचा मुद्दा सदस्य संजय बोबडी यांनी पुन्हा सभागृहात उपस्थित केला. मागील सभेतही हा प्रश्न मांडण्यात आला होता; मात्र समाधानकारक कार्यवाही न झाल्याने त्यांनी प्रशासनाला जाब विचारला.
गणेश चतुर्थीनिमित्त मोठ्या संख्येने चाकरमानी गावाकडे येणार आहेत. अशा वेळी पाण्याची समस्या निर्माण झाल्यास त्याची मोठी झळ नागरिकांना बसणार आहे. त्यामुळे गणेशोत्सवापूर्वीच हा प्रश्न निकाली काढा, अशी स्पष्ट सूचना बोबडी यांनी केली.
गतवर्षी गणेशोत्सवाच्या काळात जांभ्या दगडाने रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचे काम करण्यात आले. वर्ष उलटून गेले तरी संबंधित ठेकेदारांना पैसे मिळाले नसल्याचा मुद्दा सदस्य केशव नारकर यांनी उपस्थित केला. सभापतींनी नारकर यांना थांबण्याचा इशारा दिला; मात्र त्यानंतर नारकर आणखी आक्रमक झाले.
त्यांनी कार्यकारी अभियंता राजेंद्र सावंत यांना थेट जाब विचारत कामांच्या देयकांबाबत नाराजी व्यक्त केली. सावंत यांनी दिलेले स्पष्टीकरणही नारकर यांच्या समाधानाचे ठरले नाही.
ठेकेदारांच्या कामांच्या बिलांच्या फायली वित्त विभागाकडून जाणीवपूर्वक कपाटात ठेवण्यात येत असल्याचा गंभीर आरोप संदेश सावंत यांनी केला. ‘बिल कोणी कपाटात ठेवली, ते जाहीर करू का?’ असा सज्जड दम देत त्यांनी वित्त विभागाच्या कामकाजावर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
या आरोपानंतर सभागृहातील वातावरण चांगलेच तापले. यापुढे अशा प्रकारची पुनरावृत्ती होणार नाही, असे सभापती संतोष साटविलकर यांनी सभागृहात स्पष्ट करत या गंभीर विषयावर पडदा टाकला .
रस्त्याच्या दुतर्फा वाढलेल्या झाडीमुळे काही गावांमधील एसटी बसफेऱ्या बंद करण्यात आल्याने परिणामी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचा मुद्दा मागील सभेत सदस्य प्रमोद रावराणे यांनी उपस्थित केला होता. या समस्येवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली होती.
आजच्या सभेत बांधकाम विभागाने रस्त्यालगतची झाडी तोडण्यासाठी निधी उपलब्ध करून दिल्याची माहिती सभापतींनी दिली. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या वाहतुकीचा प्रश्न लवकर मार्गी लागण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
बोगस सही प्रकरणातील कारवाईपासून ते बिलांच्या फायलींपर्यंत आणि १७ गावांच्या पाणीप्रश्नापासून रस्त्यांच्या दुरवस्थेपर्यंत अनेक प्रश्नांवर आजची बांधकाम समिती सभा तापली. प्रशासनाच्या कारभारातील कथित विसंगतींवर सदस्यांनी थेट सवाल उपस्थित केल्याने आजची बांदकाम समिती सभा चांगलीच गाजली.मात्र यावर सभापती साटविलकर यांनी सर्व अधिकाऱ्याना सक्त सूचना देत यापुढे पारदर्शक कारभाराची अपेक्षा असून कारभार सुधारा असा सूचक इशारा दिला .
