बांदा ता.१४-:
कोकणातील पारंपरिक घरगुती गणेशोत्सव, स्थानिक संस्कृती, जैवविविधता आणि पर्यावरण संवर्धनाला चालना देण्याच्या उद्देशाने रानमाणूस फाउंडेशन, सिंधुदुर्ग यांच्या वतीने ‘श्री गणपती सजावट स्पर्धा – बाप्पा माझा राखणदार’ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘जल, जंगल, जमीन, संस्कृती वाचवूया’ हा स्पर्धेचा मुख्य संदेश असून कोकणातील निसर्ग, परंपरा आणि ग्रामजीवन जपणाऱ्या राखणदारांना या उपक्रमातून सलाम करण्यात येणार आहे.
या स्पर्धेसाठी सहा विषय निश्चित करण्यात आले असून त्यामध्ये ‘रापणकार – दर्याचा राखणदार ’, ‘मातीच्या घरांचा राखणदार’, ‘शेती, गावठी बियाणे आणि वाडीचा राखणदार’, ‘देवराईचा राखणदार’, ‘दशावतार कलेचा राखणदार’ आणि ‘गाव राखणदार – जल, जंगल, जमीन वाचवणारा संघर्ष’ या विषयांचा समावेश आहे. कोकणातील पारंपरिक गणेशोत्सवाच्या माध्यमातून स्थानिक ओळख, लोककला, पारंपरिक वास्तू, शेती, जैवविविधता आणि सांस्कृतिक वारसा जपण्याचा संदेश स्पर्धेद्वारे दिला जाणार आहे.
स्पर्धेतील प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाच्या विजेत्यांना आकर्षक बक्षिसे व प्रमाणपत्र देण्यात येणार असून, स्थानिक जैवविविधता, संस्कृती, परंपरा आणि प्रभावी सामाजिक संदेश यासाठी विशेष ‘राखणदार पुरस्कार’ही प्रदान करण्यात येणार आहे.
स्पर्धेसाठी नावनोंदणी करणे बंधनकारक असून नावनोंदणीची अंतिम तारीख ३० ऑगस्ट २०२६ आहे. अधिक माहितीसाठी ९४२३३०९१६६ व ९७६२९४९७०३ या क्रमांकांवर व्हाट्सअँप द्वारे संपर्क साधावा, असे आयोजकांनी आवाहन केले आहे.
ही स्पर्धा सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांतील पारंपरिक घरगुती गणेशोत्सवासाठी मर्यादित असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले आहे.
बाप्पा माझा राखणदार’ गणेश सजावट स्पर्धेचे आयोजन…
