बांदा/प्रतिनिधी
ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ. एस. आर. रंगनाथन यांची जयंती नट वाचनालय, बांदा येथे ‘ग्रंथपाल दिन’ म्हणून उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात वाचनसंस्कृती जोपासण्याचा संदेश देण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात समई प्रज्वलनाने झाली. त्यानंतर डॉ. रंगनाथन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी वाचनालयाचे उपाध्यक्ष निलेश मोरजकर, सचिव राकेश केसरकर, संचालिका सौ. स्वप्निता सावंत आणि प्रमुख पाहुणे अनंत भाटे उपस्थित होते.
श्री भाटे यांनी डॉ. रंगनाथन यांच्या ग्रंथालय क्षेत्रातील योगदानाचा आढावा घेत वाचनाचे महत्त्व अधोरेखित केले. ‘दिवसातून किमान एकदा तरी वाचन करण्याची सवय प्रत्येकाने लावावी,’ असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले. कार्यक्रमाच्या औचित्य साधून संत साहित्याचे विशेष प्रदर्शनही मांडण्यात आले होते.
यावेळी मिलिंद महाजन, सालू परेरा, विजेंद्र देसाई, सुनील नातू, प्रवीण परब तसेच वाचनालयाचा कर्मचारी वर्ग उपस्थित होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून राकेश केसरकर यांनी आभार मानले.
फोटो:-
बांदा नट वाचनालयात डॉ एस आर रंगनाथन जयंती साजरी करण्यात आली.
नट वाचनालय बांदा येथे डॉ. एस. आर. रंगनाथन जयंती साजरी
