कणकवली कॉलेजचे प्रा. अनिल फराकटे यांचे अनोखे दातृत्व

स्वच्छता कर्मचाऱ्यांना प्रत्येकी १ हजार रुपये देत केला गौरव,

⚡कणकवली ता.१०-: कणकवली कॉलेजमध्ये मागील अनेक वर्ष प्राध्यापक म्हणून कार्यरत असणारे प्रा. अनिल फराकटे यांनी आपल्या सेवानिवृत्तीच्या निमित्ताने अनोखी संकल्पना राबवली. केवळ कागदावरची संकल्पना न राबवता प्रत्यक्ष फिल्डवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देण्याची भूमिका प्रा. फराकटे यांनी घेतली. कणकवली शहर स्वच्छ ठेवण्यासाठी काम करणाऱ्या नगरपंचायतच्या ८१ स्वच्छता कर्मचाऱ्यांना प्रत्येकी १ हजार रुपयाची अशी एकूण ८१ हजार रुपये प्रोत्साहन रक्कम देत प्रा. फराकटे यांनी आपल्यातील दातृत्व दाखवून दिले.

नेहमीच सामाजिक उपक्रमात कार्यरत असणारे प्रा. अनिल फराकटे यांनी आपल्या सेवानिवृत्तीच्या निमित्तानेही सामाजिक बांधिलकी जपली. या दातृत्वाच्या उपक्रमाची कुठेही प्रसिद्धी न करता अनिल फराकटे यांनी आपल्या सेवाभावी कामाचा प्रसिद्धीचा हव्यासही ठेवला नाही. ही निश्चितच कौतुकास्पद बाब आहे. मागील अनेक वर्ष कणकवली कॉलेजमध्ये कार्यरत असणाऱ्या प्रा. अनिल फराकटे यांच्या हाताखाली कणकवलीतील अनेक पिढ्या शिकल्या. त्या विविध क्षेत्रात कार्यरत आहेत. याबद्दल प्रा. अनिल फराकटे यांचा कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या हस्ते सेवानिवृत्तीच्या निमित्ताने सत्कार करण्यात आला. या सत्कारप्रसंगी गटनेते संजय कामतेकर, नगरसेवक ऍड. विराज भोसले, अभिजीत मुसळे, नगरपंचायतचे ब्रँड अँबेसिडर व व्यापारी संघाचे तालुकाध्यक्ष दीपक बेलवलकर, माजी उपनगराध्यक्ष किशोर राणे आदी उपस्थित होते. प्राध्यापक अनिल फराकटे यांनी आपल्या सेवानिवृत्तीच्या निमित्ताने कणकवली नगरपंचायतच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांचा अनोख्या पद्धतीने केलेला गौरव हा अनेकांनी आदर्श घेण्यासारखाच आहे, असे गौरवोद्गार नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी काढले. प्रा. अनिल फराकटे यांनी देखील नगरपंचायतने केलेल्या सत्कार बद्दल आभार व्यक्त केले.

You cannot copy content of this page