तरवा काढणी, भात तावणी आदी कामांचा घेतला प्रत्यक्ष अनुभव
⚡सावंतवाडी ता.०९सहदेव राऊळ- : बळीराजासाठी एक दिवस या उपक्रमांतर्गत मळगाव येथील शारदा विद्यालय या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शिक्षक, पालक व मुलांनी बांधावरची शाळा उपक्रमांतर्गत मळगाव येथीलच शेतकरी राजन राऊळ यांच्या शेतात जाऊन प्रत्यक्ष तरवा काढणी, भात लावणी आदी शेतीच्या कामांचा आनंद लुटला.
विध्यार्थ्यांना बालवयापासूनच शेतकरी म्हणजेच बळीराजाबद्धल आदर व प्रेम निर्माण व्हावे, आपला देश शेतीप्रधान असल्याने शेती विषयी माहिती मिळावी, मुलांना शेतीचे महत्व पटावे, शेतीसाठी लागणाऱ्या बी बियाणांची ओळख व्हावी, शेतीची अवजारे, खते, कीटकनाशके ह्या गोष्टींचा परिचय व्हावा या हेतूने जिल्हा परिषद सिंधुदुर्गच्यावतीने बळीराजासाठी एक दिवस हा उपक्रम जिल्ह्यातील सर्व शाळा मध्ये राबविला जातो. मात्र गेले दोन वर्ष कोरोना महामारीच्या कालावधीत शाळा बंद असल्याने हा उपक्रम राबविला नव्हता. मात्र आता पुन्हा शाळा सुरु झाल्यापासून जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये हा उपक्रम राबविण्यात येत आहे. याच उपक्रमांतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शारदा विद्यालय या शाळेतील विद्यार्थी, शिक्षक, पालक व मुलांनी शेतीत जाऊन एक दिवस बळीराजासाठी उपक्रमात सहभाग घेतला..
यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका अनुराधा सुर्वे, शिक्षिका अस्मिता गोवेकर, शिक्षिका सीमा सावंत, शेतकरी राजन राऊळ, पालक व विद्यार्थी उपस्थित होते. राजन राऊळ यांनी मुलांना शेतीविषयी माहिती दिली. मुलांना आधुनिक शेती अवजारांची प्रात्यक्षिक दाखवत ती कशी चालवावीत, याविषयी माहिती दिली. यावेळी शाळेतील शिक्षक व मुलांनी तरवा काढणी, लावणी आदी कामांचा आनंद लुटला. यावेळी मुलांना खाऊचे वाटप करण्यात आले.
