⚡सिंधुदुर्गनगरी ता.०७-: जिल्ह्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील लघु पाटबंधारे प्रकल्पांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक होत आहे. त्यामुळे हे प्रकल्प येत्या एक ते दोन दिवसात पूर्ण क्षमतेने भरून पाणी धरणाच्या सांडव्यावरून ओसंडून वाहणार आहे. अशावेळी धरण परिसरातील नागरिकांनी सतर्क रहावे व सांडव्याच्या तसेच धरण क्षेत्रामध्ये जाऊ नये असे आवाहन सिंधुदुर्ग पाटबंधारे विभाग, अंबडपालचे कार्यकारी अभियंता गो.ह.श्रीमंगले यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. सिंधुदुर्ग पाटबंधारे विभाग, अंबडपाल या विभागाच्या अधिपत्याखाली जिल्ह्यातील 23 ल.पा. योजना असून काही प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरुन सांडव्यावरून मोठ्या प्रमाणात पाणी ओसंडून वाहत आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असून, पावसाचा जोर पाहत धरणांच्या पाणलोट क्षेत्रामधून येणाऱ्या पाण्याचा येवा मोठ्या प्रमाणात असल्यामुळे पुढील 1 ते 2 दिवसांत सर्व धरणे पूर्ण क्षमतेने भरुन पूर्ण संचय पातळीवरील अतिरिक्त पाणी धरणाच्या सांडव्यावरुन मोठ्या प्रमाणात ओसंडुन वाहणार आहे.
सध्या मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे धरणावरील नदीमधून वाहणाऱ्या जोरकस प्रवाहामुळे नदीच्या आजूबाजूच्या दरडी कोसळण्याची भिती असून प्रवाहाच्या पाण्याबरोबर जंगलातील जीवजंतू, साप, अजगर सारखे सरपटणारे प्राणी धरण जलाशय परिसरात वावरण्याची दाट शक्यता आहे. तसेच विभागाच्या अधिपत्याखालील माडखोल धरण जलाशयातून मोठ्या मगरीने नदीमध्ये प्रवेश केल्याचे आढळून आले आहे. याशिवाय जिल्ह्यातील इतर प्रकल्पांमध्ये मगरीचा वावर असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे जीवितास धोका निर्माण होण्याची दाट शक्यता आहे.
यासर्व बाबींचा विचार करता धरण क्षेत्र परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होऊ नये म्हणून कोणत्याही परिस्थितीत सांडवा परिसर आणि धरण क्षेत्रामध्ये पोहणे, जलक्रीडा करणे, नौकाविहार करणे तसेच पर्यटन आणि जमावांचे सहलीचे आयोजन करणे इ.बाबी करण्यात येऊ नये असे आवाहन धरण परिसर, सांडवा, पुच्छ कालवा परिसरा लगतच्या आणि आजूबाजूच्या रहिवाश्यांना, नागरिकांना करण्यात येत आहे. तसेच यासर्व बाबींकरिता धरण क्षेत्रामध्ये वावरणेस प्रतिबंध करण्यात येत आहे. तरी धरण परिसरातील जनतेने याची नोंद घेऊन सहकार्य करावे असे आवाहनही करण्यात आले आहे.
