‘तो’ कचरा उचलत केली स्वच्छ्ता
मालवण (प्रतिनिधी)
मालवण शहरातील रेवतळे या वर्दळीच्या सागरी महामार्गाच्या दुतर्फा नागरिकांकडून टाकण्यात आलेल्या दुर्गंधीयुक्त कचऱ्याची महिनोंमहिने विल्हेवाट लावण्याकडे मालवण नगरपालिका प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने संतप्त झालेल्या भाजपा युवा मोर्चाचे मालवण शहराध्यक्ष ललित चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी काल आवाज उठवत आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर श्री चव्हाण यांच्या इशाऱ्याने खडबडून जाग्या झालेल्या नगरपालिका प्रशासनाने आज या भागातील कचऱ्याची उचल करीत स्वच्छता केली
दरम्यान, येत्या दोन दिवसात सागरी मार्गावरील सर्व कचरा उचलला जाईल असे आश्वासन मुख्याधिकारी संतोष जिरगे यांनी दिले आहे. ललित चव्हाण यांच्या पुढाकाराने कचरा उचलला गेल्याने स्थानिक नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
मालवण शहरातील रेवतळे येथील सागरी महामार्गाच्या दुतर्फा कचऱ्याचे मोठे साम्राज्य पसरले असून गेले अनेक महिने हा कचरा जैसे थे असताना नगरपालिका प्रशासनाने याबाबत कोणतीही कार्यवाही केलेली नाही. सागरी महामार्गाची भाजप युवामोर्चाचे शहराध्यक्ष ललित चव्हाण व सहकाऱ्यांनी करत कचरा व खड्ड्यांमुळे रस्त्याच्या झालेल्या दुरावस्थेबाबत नगरपालिकेचे दुर्लक्ष होत असल्याबाबत नाराजी व्यक्त करत कचऱ्याच्या समस्येबाबत नगरपालिका प्रशासनाने योग्य ती कार्यवाही करावी अन्यथा आंदोलन करू, असा इशारा दिला होता. चव्हाण यांच्या या इशाऱ्यानंतर आज नगरपालिका प्रशासनाने सागरी महामार्गावरील कचरा उचल करण्याची कार्यवाही केली. नगरपालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांनी या रस्त्याच्या दुतर्फा असलेला बहुतांशी कचरा उचल करत सफाई केली आहे. यावेळी ललित चव्हाण यांच्यासह निनाद बादेकर, राजा मांजरेकर, बाबू शिंदे, संकेत जाधव, शुभम लुडबे, अनिल मुणगेकर आदी उपस्थित होते.
गेले अनेक महिने हा कचरा पडून असताना ललित चव्हाण यांनी पुढाकार घेत या कचऱ्याच्या समस्येबाबत आवाज उठवत लक्ष वेधल्याने नगरपालिकेने हा कचरा उचलल्याने स्थानिक नागरिकांनी चव्हाण यांच्या कार्याचे कौतुक करत समाधान व्यक्त केले आहे.
दरम्यान, सागरी महामार्गावरील कचऱ्याच्या समस्येबाबत ललित चव्हाण यांनी आज नगरपालिकेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी संतोष जिरगे यांची भेट घेऊन निवेदन सादर करून लक्ष वेधले. महामार्गावरील उर्वरित कचरा येत्या दोन दिवसात उचल करण्यात येईल असे आश्वासन मुख्याधिकारी संतोष जिरगे यांनी चव्हाण यांना दिले.
खड्ड्याबाबत सार्वजनिक बांधकामचे भाजयुमोने वेधले लक्ष
दरम्यान, मालवण शहरातील रेवतळे येथील सागरी महामार्गावरील खड्ड्यांच्या प्रश्नबाबत ललित चव्हाण यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे लक्ष वेधत खड्डे बुजविण्याची मागणी केली आहे . सदर महामार्गाचे काम मंजूर झाले असून लवकरच रस्त्याचे काम हाती घेण्यात येईल, असे आश्वासन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी श्री चव्हाण यांना दिले आहे.
