बोगस मतदारांबाबत आरोप सिद्ध करण्यासाठी आमरण उपोषण करा – बंडू हर्णे
कणकवली : शहरातील एसआयआर प्रक्रियेच्या अनुषंगाने नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी गेल्या पंधरा दिवसांपासून घेतलेल्या भूमिकेवर नगरसेवक गणेश उर्फ बंडू हर्णे यांनी जोरदार टीका केली आहे. संदेश पारकर यांनी १५ ऑगस्ट रोजी जाहीर केलेले उपोषण हे केवळ प्रसिद्धीत राहण्यासाठीचा स्टंट ठरू नये. त्यांनी आपल्या आरोपांवर ठाम राहत प्रत्यक्ष आमरण उपोषण करून दाखवावे, असे आवाहन श्री. हर्णे यांनी केले आहे.
नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी गेल्या पंधरा दिवसांत एसआयआरच्या मुद्द्यावर अनेक पत्रकार परिषदा घेतल्या तसेच प्रशासन आणि मंत्र्यांकडे निवेदने दिली. कणकवली शहराच्या मतदार यादीत बोगस मतदारांची नोंदणी झाल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. जर त्यांच्या म्हणण्यानुसार बोगस मतदार असतील, तर ते खरोखरच कमी झाले पाहिजेत आणि त्यासाठी पारकर यांनी सुरू केलेली मोहीम यशस्वी झाली पाहिजे. त्यामुळे उपोषणाची घोषणा करून माघार न घेता त्यांनी प्रत्यक्ष उपोषण करावे असा सल्ला बंडू हर्णे यांनी प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून दिला आहे.
उपोषणाच्या आदल्या दिवशी प्रशासनाकडून काही आश्वासन घेऊन उपोषण मागे घेण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी शक्यता असल्याचा दावा बंडू हर्णे यांनी केला. संदेश पारकर यांनी आपले उपोषण मिटवण्यासाठी मध्यस्थीचा प्रयत्न करण्यापेक्षा बोगस मतदारांच्या आरोपावर ठाम राहून आमरण उपोषण करावे. त्यामुळे त्यांनी केलेल्या आरोपांमध्ये किती तथ्य आहे, हे कणकवलीच्या जनतेसमोर उघड होईल.
कणकवली शहरातील मतदार यादी आणि अधिकाऱ्यांवर आरोप करताना पारकर यांनी बोगस मतदार नोंदणीचा मुद्दा उपस्थित केला. ही नोंदणी झालेली असेल तर संबंधित नावे मतदार यादीतून कमी झाली पाहिजेत. मात्र अशी नोंदणी झालेलीच नसेल, तर गेल्या काही दिवसांपासून करण्यात आलेला आटापिटा कशासाठी होता, याचे उत्तरही नगराध्यक्षांनी जनतेला द्यावे, अशी मागणी श्री. हर्णे यांनी केली.
मुख्याधिकारी आपल्या म्हणण्यानुसार काम करत नाहीत म्हणून त्यांच्यावर आरोप, तहसीलदार आणि प्रांताधिकारी ऐकत नाहीत म्हणून त्यांच्यावर आरोप, जिल्हाधिकारी ऐकत नाहीत म्हणून त्यांच्यावरही आरोप, असा आरोपांचा सिलसिला सुरू आहे. आता प्रशासनातील कोणावर आरोप करायचा शिल्लक राहिला नसल्याने प्रसिद्धीत राहण्यासाठी प्रशासनावर आरोप करण्याचा हा प्रकार असल्याची टीकाही श्री. हर्णे यांनी केली.
जर कणकवली शहरातील बोगस मतदारांमुळे मागील निवडणूक प्रभावित झाली, असे पारकर यांचे म्हणणे असेल, तर त्याच बोगस मतदारांच्या आधारावर आपण नगराध्यक्ष झालात का, याचेही उत्तर नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी असा टोलाही बंडू हर्णे यांनी लगावला आहे.
नगराध्यक्षांनी आरोप केले असतील तर आता मिटवामिटवी न करता ते सिद्ध करण्याची वेळ आली आहे. पारकर यांनी आमरण उपोषण करावे. कणकवली शहराचे नगराध्यक्ष म्हणून उपोषणस्थळी आवश्यक वैद्यकीय मदतीची सोय करण्याचीही आमची तयारी आहे. मात्र केवळ प्रसिद्धीसाठी उपोषणाची घोषणा करून त्यातून माघार घेऊ नये, असे आवाहन हर्णे यांनी केले.
कणकवलीचे नगराध्यक्ष यापुढे कर्नाटकातील नव्हे, तर कणकवलीतील मतदारच निवडतील. त्यामुळे मतदार यादीतील कथित बोगस नावे आणि एसआयआर प्रक्रियेबाबत केलेले आरोप खरे असतील तर ते उपोषणाच्या माध्यमातून सिद्ध करून दाखवावेत. आरोप करून मागे न हटता आमरण उपोषण करावे, असेही श्री. हर्णे यांनीं प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
