Headlines

SIR कामकाजाबाबत नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्या निवेदनाला तहसीलदारांचे उत्तर…

१७ ऑगस्टपर्यंत मतदार पडताळणीचे काम सुरू:२४ ऑगस्टला प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होणार..

⚡कणकवली ता.१४-: मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरिक्षणाच्या (SIR) कामकाजाबाबत कणकवली नगराध्यक्ष संदेश भास्कर पारकर यांनी प्रशासनाकडे केलेल्या निवेदनाला सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार, कणकवली यांनी लेखी उत्तर दिले आहे. ११ ऑगस्ट २०२६ रोजी काढलेल्या या पत्रातून SIR प्रक्रियेची सद्यस्थिती, मतदार पडताळणीचे काम तसेच पुढील निवडणूक प्रक्रियेबाबत प्रशासनाने माहिती दिली आहे.

नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी ३१ जुलै रोजी प्रशासनाकडे निवेदन सादर केले होते. मतदार नोंदणी व मतदार यादी सर्वेक्षणांतर्गत सुरू असलेल्या विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) कामकाजाबाबत मार्गदर्शक सूचना, संबंधित अभिलेख आणि आकडेवारी उपलब्ध करून देण्यात यावी, अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली होती. या निवेदनाच्या अनुषंगाने तहसीलदार कार्यालयाने पारकर यांना हे उत्तर दिले आहे.

भारत निवडणूक आयोग तसेच मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र यांच्या निर्देशानुसार महाराष्ट्रासह १६ राज्ये आणि ३ केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरिक्षण अर्थात Special Intensive Revision (SIR) कार्यक्रम राबविण्यात येत आहे. २६८ कणकवली विधानसभा मतदारसंघात या कार्यक्रमाची अंमलबजावणी २० जून २०२६ पासून सुरू करण्यात आली असून, भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार हे कामकाज सुरू असल्याचे प्रशासनाने पत्रात स्पष्ट केले आहे. या प्रक्रियेच्या अनुषंगाने सर्व राजकीय पक्षांचे तालुकाप्रमुख तसेच मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधी (BLA) यांच्या बैठका घेऊन आवश्यक माहिती देण्यात आल्याचेही नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, SIR अंतर्गत सुरू असलेल्या मतदार पडताळणीच्या कामाला भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार १७ ऑगस्ट २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे मतदार पडताळणीचे काम अद्याप सुरू असून, त्यानंतर २४ ऑगस्ट २०२६ रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. या प्रारूप मतदार यादीवर २४ ऑगस्ट ते २३ सप्टेंबर २०२६ या कालावधीत दावे व हरकती दाखल करता येणार आहेत. प्रारूप मतदार यादीसोबत मयत, स्थलांतरित, दुबार तसेच संबंधित वर्गवारीतील मतदारांची ASDD List / Uncollectable (UEF) यादीही प्रसिद्ध केली जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

SIR प्रक्रियेबाबत प्रशासनाकडून देण्यात आलेल्या या लेखी उत्तरानंतर आता पुढील कार्यवाहीकडे लक्ष लागले आहे. दरम्यान, SIR संदर्भात उद्या सायंकाळी ४ वाजता कणकवली तहसीलदार कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला सर्व उमेदवार, निरीक्षक, प्रमुख कार्यकर्ते आणि BLA यांनी आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी केले आहे.

You cannot copy content of this page