ॲकेडमीचे दहाव्या वर्षात दिमाखदार पदार्पण..
⚡सावंतवाडी ता.१४-: येथील मुक्ताई ॲकेडमीने आपल्या यशस्वी वाटचालीचे दहावे वर्ष दिमाखात सुरू करताना ॲकेडमीच्या नव्या जर्सीचे मान्यवरांच्या हस्ते शानदार अनावरण केले.
यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे सावंतवाडीचे तहसीलदार श्री.श्रीधर पाटील, सुप्रसिद्ध प्रेरणादायी व्याख्याते प्रा.रुपेश पाटील, बँक ऑफ इंडिया सावंतवाडी शाखेचे वरिष्ठ प्रबंधक विनायक नार्वेकर, जनार्दन लक्ष्मण शिर्सेकर शिक्षण संस्था, मुंबईच्या संचालिका अनुपमा शेटगे, पाटणकरवाड्याचे सुशांत पाटणकर, पत्रकार साबाजी परब आदी मान्यवर आणि मुक्ताई ॲकेडमीचे अध्यक्ष कौस्तुभ पेडणेकर, सरचिटणीस सौ.स्नेहा पेडणेकर आणि कोषाध्यक्ष बाळकृष्ण पेडणेकर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी कौस्तुभ पेडणेकर यांनी उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते ॲकेडमीच्या नव्या जर्सीचे अनावरण करण्यात आले. खेळाडूंच्या चेहऱ्यावरील उत्साह आणि नव्या जर्सीचा अभिमान यामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली.
“स्पर्धा परीक्षेत मिळवलेल्या यशामागे केवळ अभ्यास नव्हता, अभ्यासासोबतच शालेय उपक्रम आणि विविध खेळांमध्ये घेतलेला सहभाग देखील महत्त्वाचा होता. खेळामुळे विविध खेळांची, खेळाडूंची आणि स्पर्धांची जाण निर्माण झाली. विदयार्थ्यांनी अभ्यासासोबत एक तरी खेळ खेळून त्यात प्रावीण्य मिळवावे. कारण खेळातूनच जिद्द, शिस्त, आत्मविश्वास आणि विजयाची मानसिकता घडते,” असा यशाचा कानमंत्र सावंतवाडीचे तहसीलदार श्रीधर पाटील यांनी विदयार्थ्यांना दिला. मुक्ताई ॲकेडमी विदयार्थ्यांसाठी घेत असलेल्या कार्याचे त्यांनी कौतुक केले.
प्रा.रुपेश पाटील यांनी मुक्ताई ॲकेडमीचा संघर्षमय आणि प्रेरणादायी प्रवास जवळून पाहिल्याचे सांगितले. सावंतवाडी शहरात बुदधिबळ आणि कॅरमसारखे बुदधीला चालना देणारे खेळ कौस्तुभ पेडणेकर यांच्या माध्यमातून अत्यंत प्रभावीपणे रुजविले जात असल्याचे सांगत त्यांनी मुक्ताई ॲकेडमीच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
विनायक नार्वेकर यांनी आपल्या पाल्यांना मुक्ताई ॲकेडमीच्या माध्यमातून दर्जेदार प्रशिक्षण मिळत असल्याचे नमूद केले. कौस्तुभ पेडणेकर यांच्या अथक परिश्रमातून विदयार्थ्यांना क्रीडा प्रशिक्षणासोबतच संस्कारक्षम वातावरण मिळत असल्याचे सांगत त्यांनी ॲकेडमीच्या कार्याचे कौतुक केले.
प्रास्ताविकात अध्यक्ष कौस्तुभ पेडणेकर यांनी मुक्ताई ॲकेडमी गेल्या दहा वर्षांपासून जिल्ह्यातील विदयार्थ्यांसाठी कॅरम, बुदधिबळ, टेबल टेनिस यांसह ॲक्टिंग, म्युझिक, डान्स अशा विविध उपक्रमांचे सेमिनार, कोचिंग आणि विविध स्पर्धांचे आयोजन करत असल्याचे सांगितले.
मुक्ताई ॲकेडमीच्या या दशकपूर्ती पदार्पण सोहळ्याने केवळ नव्या जर्सीचे अनावरण केले नाही, तर सावंतवाडीच्या क्रीडा विश्वात नव्या पिढीच्या स्वप्नांना, जिद्दीला आणि कर्तृत्वाला नवी झेप देण्याचा संकल्पही अधोरेखित केला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कौस्तुभ पेडणेकर यांनी आणि आभार प्रदर्शन स्नेहा पेडणेकर यांनी केले.
