Headlines

माड्याचीवाडी-करमळगाळू पापडी कॉजवेला भगदाड…

तातडीच्या दुरुस्तीची मागणी:सूचना फलक नसल्याने वाहनधारकांमध्ये चिंता..

कुडाळ : पिंगुळी-पाट मार्गावरील माड्याचीवाडी-करमळगाळू पापडी येथील कॉजवे पावसामुळे खचून एका बाजूला मोठे भगदाड पडले आहे. मात्र अद्याप सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दुरुस्ती किंवा वाहनधारकांना सावध करण्यासाठी सूचना फलक उभारण्यात आलेला नसल्याने या मार्गावरून प्रवास करणाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
पिंगुळी-पाट मार्ग हा परुळे-चिपी विमानतळ तसेच खवणे, निवती समुद्रकिनाऱ्याकडे जाणारा महत्त्वाचा मार्ग असल्याने येथे दिवसरात्र मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते. एसटी बस, अवजड वाहने तसेच लहान वाहनांची सतत वर्दळ असल्याने कॉजवेचा उर्वरित भागही खचण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, या ठिकाणी दरवर्षी पावसाळ्यात भगदाड पडते. मात्र कायमस्वरूपी उपाययोजना न करता केवळ तात्पुरती दुरुस्ती करण्यात येत असल्याने ही समस्या पुन्हा उद्भवत आहे. गेल्यावर्षी ज्या बाजूला भगदाड पडले होते, त्याच ठिकाणी यंदाही पुन्हा रस्ता खचल्याने कॉजव्याच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
सध्या ग्रामस्थांनी वाहनधारकांना इशारा मिळावा म्हणून भगदाडाजवळ झाडांच्या फांद्या ठेवलेल्या आहेत. त्यामुळे वाहनचालक सावधगिरीने एका बाजूने वाहतूक करत असले तरी रात्रीच्या वेळी अपघाताचा धोका अधिक वाढला आहे.
या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ कॉजव्याची दुरुस्ती करून भगदाड बुजवावे, तसेच वाहनधारकांच्या सुरक्षिततेसाठी सूचना फलक आणि आवश्यक संरक्षण व्यवस्था उभारावी, अशी मागणी वाहनधारक व स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.

You cannot copy content of this page