माजी नगरसेविका ममता वराडकर यांनी स्वः खर्चाने झाड तोडून घेत मार्ग केला पूर्ववत…
मालवण, दि प्रतिनिधी
मालवण शहरातील कोथेवाडा येथील रस्त्यावर आज दुपारी बदामाचे मोठे झाड पडले. वस्तीकडे जाणाऱ्या मार्गावरच झाड पडल्याने तेथील रहिवाशांची गैरसोय झाली. त्यामुळे ही बाब लक्षात येताच स्थानिक माजी नगरसेविका ममता वराडकर यांनी स्वखर्चातून हे झाड तोडून घेत मार्ग पूर्ववत केला.
कालपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसाचा जोर आजही कायम होता. यात तालुक्यात अनेक ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या आहेत. शहरातील कोथेवाडा येथे दुपारी अचानक बदामाचे झाड कोसळले. रस्त्यालगतची धोकादायक मोठी झाडे संबंधित मालक तोडत नसल्याने याबाबत कार्यवाही करण्यासाठी पालिका प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले होते. मात्र मोठी झाडे तोडणे पालिकेस शक्य नसल्याचे सांगण्यात आले. कोथेवाडा येथे झाड पडल्याने वस्तीकडे जाणारा मार्ग बंद झाला. याची माहिती मिळताच माजी नगरसेविका ममता वराडकर यांनी घटनास्थळी जात झाडे कटाई करणाऱ्या माणसांना बोलावून घेत हे झाड हटवित मार्ग खुला केला.
फोटो- कोथेवाडा येथे पडलेले बदामाचे झाड हटवित मार्ग पूर्ववत करण्यात आला.
