⚡मालवण ता.०५-: मालवण शहरातील गटार व व्हाळ्यांची सफाई न झाल्याने पावसाचे पाणी साचून मालवण शहर जलमय होत आहे. नगरपालिकेचे ढिसाळ नियोजन फक्त कामाचा दिखाऊपणा यामुळेच शहारत मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. ठेकेदार काम करत नाही असे उत्तर देऊन आपली जबाबदारी झटकण्याचे काम वेळोवेळी मुख्याधिकारी करत आहेत. या पार्श्वभूमीवर गटार खोदाई व शहरातील इतर समस्यांबाबत प्रशासनाकडून उत्तरे घेण्यासाठी सोमवार ११ जुलै रोजी सकाळी ११ वाजता भाजपचे प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे हे मालवण नगरपरिषदेवर धडक देणार आहेत, अशी माहिती भाजपा शहर प्रभारी विजय केनवडेकर, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, माजी नगरसेवक दीपक पाटकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
नगरपरिषदेने तक्रार करण्यासाठी दिलेला कर्मचाऱ्याचा फोन नंबर स्विच ऑफ लागतो. नगरपालिकेत प्रत्यक्ष प्रशासनाला विचारणा केली असता कोणतेही समाधानकारक व ठोस उत्तर कोणी देत नाही. असे असताना नालेसफाई व गटार सफाई करणाऱ्या ठेकेदाराचे बिल काढून प्रशासन मोकळे झाले आहे. कोणत्याही प्रकारे कामाची शहानिशा न करता काढलेली बिले ही टक्केवारीच्या संशयाच्या भौऱ्यातच आहेत. पावसाळ्याच्या आधीच भाजपाने नालेसफाई व गटार सफाई संदर्भात नगरपालिकेचे लक्ष वेधले होते. त्याच अनुसरून आमदार वैभव नाईक यांनी आढावा बैठक घेऊन मुख्याधिकाऱ्यांना लवकरात लवकर साफ सफाई करण्याचे निर्देश दिले होते. हे निर्देश मुख्याधिकाऱ्यांनी न पाळता केराची टोपली दाखवली आहे. यावरूनच प्रशासनावर असणारी वचक आमदारांची दिसून आली आहे. आधी सत्ताधारी असणारे व आता विरोधात असणारे लोकप्रतिनिधी मुख्याधिकाऱ्यांची बाजू घेऊन मुख्याधिकारीच कार्यसम्राट आहेत याची प्रसिद्धीमार्फत जनतेला प्रचिती देत होते, कोणतीही टीका केली तरी शिवसेनेचे माजी नगरसेवक मुख्याधिकाऱ्यांची कायम तळी उचलून धरत होते. हेच तळी उचलणारे लोकप्रतिनिधी पाणी साठल्याबरोबर मुख्याधिकारी कसे कामचुकार आहेत हे दाखवण्यासाठी फोटोसेशन करताना दिसत आहेत. भाजपा जनतेसमोर स्पष्टता मांडत असताना जनतेचे विषय घेऊन भांडत असताना विकासाला खीळ घालतात असे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचं कायम टीका केली जात होती. आता हेच मुख्याधिकाऱ्यांवर टीका करून जनतेच्या डोळ्यात धुळफेक करण्याचे काम व नगरपालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आपण कसे स्वच्छ होत हे दाखवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. या सर्व प्रश्नांबाबत माजी खासदार निलेश राणे सोमवारी नगरपालिकेत धडक देणार आहेत, अशी माहितीही विजय केनवडेकर, सुदेश आचरेकर, दीपक पाटकर दिली आहे.
