मायनिंगची माती घुसली शेतात

कोंडुरा येथील शेतकऱ्याचे नुकसान : विहीर कोसळल्याने आर्थिक बाजू कोलमडली

⚡सावंतवाडी ता.०५-: सावंतवाडी तालुक्यात सलग दोन दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसाचा फटका मळेवाड-कोंडुरा येथील शेतकरी भाऊ मडुरकर व अर्जुन मुळीक, अशोक मुळीक यांना बसला. चुकीच्या पध्दतीने डम्प करून ठेवलेली मायनिंगची माती आज शेतकऱ्यांसाठी नुकसानीची ठरली. चिखल माती पाण्यासह शेतात घुसल्याने भातशेतीचे नुकसान होणार आहे. तसेच भाऊ मडूरकर यांच्या विहिरीचा काही भागही कोसळला. प्रशासनाने तसेच मायनिंग विभागाने याची पाहणी करावी व पंचनामा करून नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी अर्जुन मुळीक, अशोक मुळीक यांनी केली.

कोंडुरा तळवणे आरोस सीमाभागात मायनिंगच्या मातीचे भलेमोठे ढिगारे उभारून ठेवले आहेत. सोमवारी पहाटेपासून सुरू झालेला मुसळधार पाऊस दुसऱ्या दिवशीही कायम होता. शेतीच्या बाजूला डंप केलेली माती पाण्याला अडचण ठरली. दरवर्षीप्रमाणे पाणी जाण्यासाठी कोणतीही उपाययोजना मायनिंग विभागाने न केल्यामुळे शेतकरी अर्जुन मुळीक यांचे नुकसान झाल्याचे जिल्हा परिषद माजी सदस्य राजन मुळीक यांनी पाहणीदरम्यान सांगितले.

प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे आज शेतकऱ्यांना विनाकारण आर्थिक व शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे. जर पाणी जाण्यासाठी योग्य मार्ग बनविला असता तर मायनिंगची माती व चिखल पाणी शेतात घुसले नसते. तरी संबंधितांनी याची दखल घेऊन तात्काळ पाहणी करावी तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्यांची योग्य ती भरपाई द्यावी अन्यथा अधिकाऱ्यांना कार्यालयात जाऊन जाब विचारला जाईल असा इशारा जिल्हा परिषद माजी सदस्य राजन मुळीक यांनी दिला.

You cannot copy content of this page