मुख्याधिकारी संतोष जिरगे
⚡मालवण ता.०१-: मालवण शहरातील गटार व व्हाळी मध्ये पाला पाचोळा, झाडांच्या फांद्या, प्लास्टिक बॉटल व इतर कचरा अडकून राहिल्याने पाण्याचा प्रवाह थांबून पाणी तुंबण्याचा प्रकार होत आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांनी गटार व्हाळी मध्ये कचरा, प्लास्टिक बॉटल व वस्तू, तोडलेली झाडे आदी कोणत्याही टाकाऊ वस्तू टाकू नयेत असे आवाहन मालवण नगरपालिका आरोग्य विभागाने केले असून असे करताना कोणी आढळल्यास त्यांच्यावर प्रशासनाकडून कारवाई करण्यात येईल, असा इशारा मुख्याधिकारी संतोष जिरगे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिला आहे.
मालवण नगरपरिषद आरोग्य विभागामार्फत नियुक्त ठेकेदाराकडून शहरातील प्रमुख व्हाळ्या व गटारांची सफाई केलेली आहे. तसेच उर्वरीत भागातील गटारांची सफाई देखील युद्धपातळीवर सुरु आहे. मालवण शहर तीन बाजूनी समुद्राने वेढलेले असून समुद्राच्या भरती-ओहोटीचा भू-जल पातळीवर परिणाम होतो. त्याचबरोबर सध्या कोणतीही उसंत न घेता पाऊस सातत्याने कोसळत आहे. अशा परिस्थितीत शहरातील सखल भागात पाणी साचते त्या भागातील पाणी निचरा होण्यासाठी काहीवेळा समुद्राच्या भरती ओहोटीवर विसंबून रहावे लागते. सध्या साफ सफाई केलेल्या गटार अथवा व्हाळ्यामध्ये नव्याने वाहून आलेला पाला-पाचोळा, कचरा, झाडांच्या फांद्या, प्लास्टिक बॉटल्स, इतर प्लास्टिक अडकून प्रवाहात अडथळे येवून पाण्याचे प्रवाह चोकअप होण्याचा व त्यामुळे पाणी थांबण्याचा प्रकार दिसून येत आहे. त्यामुळे कोणीही गटार-व्हाळी मध्ये आपल्या परिसरातील कचरा, तोडलेली झाडे झुडपे/फांद्या, पालापाचोळा, प्लास्टिक अथवा अन्य कोणताही टाकाऊ पदार्थ टाकू नये; असे करताना कोणीही आढळून आल्यास प्रशसनाकडून संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येईल, असे मुख्याधिकारी संतोष जिरगे यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
तसेच शहरात पाणी साचून राहिल्यास तेथे न.प. कर्मचाऱ्यांमार्फत तात्काळ योग्य ती कार्यवाही करण्यासाठी पथक तयार ठेवण्यात आलेले आहे. तरी देखील शहरात कोणत्याही सार्वजनिक भागात पाणी तुंबण्यामुळे नागरिकांच्या जीवास / मिळकतीस धोका होण्याचा संभव आहे असे वाटल्यास नागरिकांनी तात्काळ न.प. आरोग्य विभागाचे शहर समन्वयक निखील नाईक – 8605269971, लिपिक मंदार केळुसकर- 7066264158, स्वच्छता पर्यवेक्षक प्रणव घोरपडे- 8605171010, स्वच्छता निरीक्षक प्रसाद भुते- 8888391426, मुकादम आंनद वळंजू- 9403557341, सफाई कर्मचारी मिथुन शिगले- 8329362883 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन मुख्याधिकारी श्री. जिरगे यांनी केले आहे.
