शाहू महाराज केवळ बोलके राजे नव्हते, ते कर्ते समाज सुधारक होते

दीपक पडेलकर:समता प्रेरणाभुमी संवर्धन समितीच्यावतीने शाहू महाराज जयंती

सावंतवाडी ता.२७-: छत्रपती शिवाजी महाराजांनंतर अडीचशे वर्षांनी कोल्हापूर संस्थानातून सत्तेचा उपयोग लोककल्याणासाठी करणारा दुसरा महापुरुष म्हणजे राजश्री शाहू महाराज होय. राजर्षी शाहू महाराज हे केवळ बोलके राजे नव्हते तर खऱ्या अर्थाने कर्ते समाज सुधारक होते.महात्मा फुलेंचे ते खरे वारसदार होते. राष्ट्रवादाला व्यापक तत्वाचे अधिष्ठान प्राप्त करून देणाऱ्या राजश्री शाहू महाराजांचे चरित्र नव्या पिढीने समजून घेणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन समता प्रेरणा भूमी संवर्धन समितीचे अध्यक्ष दीपक पडेलकर यांनी येथे केले.


समता प्रेरणाभूमी संवर्धन समितीच्या वतीने राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज मंदिर सभागृहात आज अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर सचिव मोहन जाधव, शांताराम असनकर, कांता जाधव, सुरेश जाधव,रश्मी पडेलकर, श्रद्धा असनकर, ममता जाधव इत्यादी मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी श्री. पडेलकर यांच्या हस्ते राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला त्यानंतर शांताराम असनकर यांनी प्रस्ताविक करून राजर्षी शाहू महाराज यांच्या कार्याचा आढावा घेतला.
त्यानंतर श्री.पडेलकर यांनी राजश्री शाहू महाराजांच्या सामाजिक, शैक्षणिक कार्याचा आढावा घेऊन तत्कालिन कोल्हापूर संस्थांनचा कारभार कसा लोकाभिमुख होता हे स्पष्ट केले. श्री पडेलकर यांनी बोलताना राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी अवघ्या अठ्ठावीस वर्षाच्या काळात केलेले कार्य हे हिमालयाच्या उंचीचे होते असे सांगितले. मोफत व सक्तीचे प्राथमिक शिक्षण,विधवा पुनर्विवाह कायदा, मागासवर्गीयांना दिलेले आरक्षण, त्यांना व्यवसाय करण्यासाठीचे प्रोत्साहन,हॉटेल प्रवेश, सर्व समाजासाठी वसतीगृहे इ. त्यांचे कार्य सांगून कोल्हापूर हे खऱ्या अर्थाने शिक्षणाचे माहेरघर होते हे स्पष्ट केले. एखाद्या मुलाला भविष्यात अपंगत्व येऊ नये म्हणून जसा पोलिओ डोस दिला जातो तसा समाज पंगू होऊ नये म्हणून महापुरुषांच्या विचारांचा डोस वेळोवेळी देणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले. यावेळी रश्मी पडेलकर, मोहन जाधव यांनीही अभिवादनपर विचार मांडले.शेवटी कांता जाधव यांनी आभार मानले.

You cannot copy content of this page