⚡सावंतवाडी ता.२७-: : दोन दिवस कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे जुना बाजार येथील घरावर काल रात्री 10 वाजण्याच्या सुमारास नगर परिषदेच्या हद्दीतील भलेमोठे गुलमोहराचे झाड कोसळल्याने शैलेश प्रभाकर नेमळेकर यांच्या छप्पराचे नुकसान झाले. मात्र सुदैवाने नेमळेकर यांचा त्यात जीव वाचला.
नेमळेकर हे जुना बाजार 2 नंबर शाळा येथील रहिवासी असून रात्री 10 च्या सुमारास नुकतेच जेवून झोपले होते, तेवढ्यातच त्यांच्या घरावर हे झाड कोसळले. छप्परावरील कवले तुटून अंगार पडताच नेमळेकर यांनी मोठ्याने आरडा ओरड केल्यामुळे आजूबाजूच्यां घरातुन लोक धावून आली व नेमळेकर यांना घरातुन सहीसलामत बाहेर काढले
त्यानंतर माजी नगरसेवक सुधीर आरिवडेकर, बंटी माठेकर , देव्या सूर्याजी, जयू मिशाळ यांनी घटनास्थळी धाव घेतली. काही वेळेत नगरपरिषदेचे कर्मचारी दीपक म्हापसेकर आपत्कालीन नगरपरिषद कर्मचाऱ्यांची टीम घेऊन घटनास्थळी दाखल झाले तर बंटी माठेकर यांनी तत्काल सामाजिक बांधिलकीच्या आपत्कालीन टीमला फोन केला असता असता सामाजिक बांधिलकीचे रवी जाधव, माजी नगरसेवक संजय पेडणेकर, अरुण घाडी घटनास्थळी तात्काळ दाखल झाले व मदत कार्य सुरू केल.
दोन महिन्यापूर्वीच नेमळेकर यांनी सुमारे 97 हजार रुपये कर्ज काढून घराचे छप्पर नवीन केलं होत. त्याच छप्परावर झाड कोसळल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. नगरपालिकेच्या हद्दीमध्ये असलेल्या त्या झाडाबाबत नेमळेकर यांनी वारंवार नगरपालिकेला याची कल्पना देऊनही त्यांनी कुठल्याही प्रकारे कारवाई केली नाही असे ते यावेळी म्हणाले. मदत कार्य पहाटे दोन पर्यंत सुरू होते या मदत कार्यासाठी प्रतीक बांदेकर, दीपेश शिंदे, मिलिंद सुकी, रमेश जाधव आणि तेथील ग्रामस्थांचे मोठे योगदान लाभले.
