हत्ती, गव्यांचा बंदोबस्त करण्यास वनविभाग अपयशी : गुरुदास गवंडे
⚡बांदा ता.२४-: सरकारी वनक्षेत्रे काळा दगडवाल्यांच्या घशात घालण्याचे काम वनविभाग करत आहे. दररोज दुपारी ब्लास्टिंग होत असल्यामुळे वन्यप्राणी घाबरून भातशेतीचे नुकसान करतात अन याकडे अधिकारीच दुर्लक्ष करत असल्यामुळे रोणापाल येथील संजय गावडे यांच्या पेरणीचे नुकसान झाले. त्यामुळे सदर घटनेची तात्काळ दखल घेत नुकसानीचा पंचनामा न केल्यास सावंतवाडी कार्यालयाला टाळे ठोकणार असल्याचा इशारा मनसे सावंतवाडी तालुकाध्यक्ष तथा निगुडे उपसरपंच गुरुदास गवंडे यांनी दिला आहे.
गवा रेडे, हत्ती यांचा बंदोबस्त करण्यात वनविभाग पूर्णपणे अपयशी ठरले आहे. वन्यप्राण्यांना आवश्यक असणाऱ्या उपायोजना सरकारी वनक्षेत्रात होत नाहीत.
एकीकडे बँक किंवा सहकारी सोसायट्यांमधून कर्ज काढून शेतकरी पडीक जमीन लागवडीखाली आणतो. तर दुसरीकडे सरकारी वनक्षेत्रे काळा दगडवाल्यांच्या घशात घालण्याचे काम वनविभाग करत आहे. त्यामुळे वन्यप्राणी घाबरून भातशेतीत घुसतात. परंतु याकडे अधिकाऱ्यांचे सोयीस्कर दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे नुकसानीचा येत्या दोन दिवसांत पंचनामा करून शेतकऱ्यास भरपाई न दिल्यास वनविभागाच्या कार्यालयाला टाळे ठोकू असा इशारा गुरुदास गवंडे यांनी दिला आहे.
