⚡सावंतवाडी ता.२९-: जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सिंधुदुर्ग, जयमदत्त मठकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, सावंतवाडी तसेच टोपिवाला स्मारक तंत्रशाळा व कनिष्ठ महाविद्यालय, सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने पंडित दीनदयाळ उपाध्याय विश्वकर्मा रोजगार महाकुंभाचे आयोजन करण्यात आले.सावंतवाडी येथे आयोजित या रोजगार मेळाव्याचा शुभारंभ सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रमोद कामत यांच्या उपस्थितीत करण्यात आला.
या रोजगार मेळाव्यात विविध कंपन्या व आस्थापनांमार्फत रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात आल्या.
या उपक्रमांतर्गत युवक-युवतींना रोजगाराच्या संधी मिळण्याबरोबरच कौशल्य विकास, स्वयंरोजगार आणि व्यावसायिक प्रशिक्षणाबाबत मार्गदर्शन करण्यात आले. शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या माध्यमातून हा उपक्रम राबविण्यात आला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते तसेच कौशल्य विकासमंत्री अॅड. मंगल प्रभात लोढा यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभर विश्वकर्मा रोजगार महाकुंभाचे आयोजन करण्यात येत आहे. या उपक्रमातून युवकांना रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

